खलाशांवर चाकूहल्ला
By Admin | Published: April 25, 2015 12:51 AM2015-04-25T00:51:05+5:302015-04-25T01:09:52+5:30
साथीदारास अटक : जखमींवर रुग्णालयात उपचार
मालवण : रवी जनार्दन परब (वय ४२, रा. देवगड दहिबाव) आणि दामोदर बाबली वेंगुर्लेकर (वय ६०, रा. कोळंब खालचीवाडी) या दोन खलाशांवर साथीदार राजू वामनराव सुरूलकर (रा. पोहा, ता. कारंजलाड, जि. वाशिम) याने गुरूवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास दारूच्या नशेत शिवीगाळ करीत चाकूचे वार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संशयित आरोपी राजू सुरूलकर याला मालवण पोलिसांनी अटक केली आहे.
जखमी रवी जनार्दन परब याला गोवा- बांबुळी येथील रूग्णालयात दाखल केले असून या हल्ल्यात किरकोळ जखमी झालेले दामोदर वेंगुर्लेकर हे मालवणच्या ग्रामीण रूग्णालयात उपचार घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जानू राजाराम सावजी यांचा ब्रह्मयोगी नावाचा ट्रॉलर मालवण बंदर जेटीनजिकच्या समुद्रात उभा करून ठेवला होता. या ट्रॉलरवर दामोदर बाबली वेंगुर्लेकर, रवी जनार्दन परब आणि राजू वामनराव सुरूलकर हे तीन खलाशी होते. ट्रॉलरवर जेवण बनविल्यानंतर या खलाशांमध्ये वादावादी झाली.
या वादात राजू सुरूलकर मच्छीमारी जाळी कापण्यासाठी वापरण्यात येणारा चाकू हातात घेऊन दारूच्या नशेत रवी याच्या छातीवर वार केले तर त्याच्यासोबत असणाऱ्या दामोदर वेंगुर्लेकर याच्यावरही हल्ला चढविला. या हल्ल्यात रवी परब याला गंभीर दुखापत झाली तर दामोदर वेंगुर्लेकर हे किरकोळ जखमी झाले. जखमी झालेल्या या दोघांनाही मालवणच्या ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. रवी परब याची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्याला अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले आहे. याबाबत दामोदर बाबली वेंगुर्लेकर यांनी मालवण पोलिसात माहिती दिली आहे. पोलिसांनी संशयित आरोपी राजू सुरूलकर याला अटक केली आहे. याबाबत पोलीस निरीक्षक विश्वजीत बुलबुले यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल परूळेकर अधिक तपास करीत
आहेत. (प्रतिनिधी)