सिंधुदुर्गात चाकरमानी दाखल
By admin | Published: August 26, 2014 11:01 PM2014-08-26T23:01:18+5:302014-08-26T23:10:52+5:30
गणेशोत्सवाची लगबग : पावसाच्या संततधारेने तारांबळ
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घरोघरी साजरा होणारा गणेशोत्सव आता दोन दिवसांवर आल्याने उत्सवासाठी लगबग सुरू झाली आहे. मुंबईतून दररोज हजारो भाविक गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे, एस.टी. महामंडळाच्या बस अथवा
खासगी गाड्यांनी सिंधुदुर्गात दाखल होत आहेत. मंगळवारपासून भाविकांच्या गर्दीने बाजारपेठा फुलू लागल्या आहेत.
दरम्यान, मागील आठवड्यात काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारी सायंकाळपासून मेघगर्जनेसह दमदार
हजेरी लावल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली आहे. येत्या ४८ तासांत कोकण परिसरात मुसळधार पर्जन्यवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घराघरांत गणेशोत्सव साजरा केला जातो. या उत्सवासाठी चाकरमानी मोठ्या
संख्येने दरवर्षी न चुकता दाखल होतात. दीड, पाच, सात, अकरा, सतरा, एकवीस दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो.
सिंधुदुर्गात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणारी मंडळे फार कमी आहेत. मात्र, घरोघरी श्री गणेश पूजन केले जाते. गेला महिनाभर या उत्सवाची करण्यात येणारी पूर्वतयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दीप्रत्येक ठिकाणच्या आठवडा बाजारपेठा आणि महत्त्वाच्या ठिकाणच्या बाजारपेठांमध्ये सध्या ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी होत आहे. त्यातच पावसाने सुरुवात केल्यामुळे लोकांची तारांबळ उडत आहे. मात्र, असे असले तरी भाविक बाजारपेठेत गर्दी करून खरेदी करत आहेत.