वळीवंडे ग्रामपंचायत निवडणुकीत सेनेपुढे गड राखण्याचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 10:15 PM2017-12-13T22:15:29+5:302017-12-13T22:15:46+5:30
शिरगाव : राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचे होम पिच असलेल्या देवगड तालुक्यातील वळीवंडे गावच्या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत तिरंगी लढत होणार आहे.
शिरगाव : राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचे होम पिच असलेल्या देवगड तालुक्यातील वळीवंडे गावच्या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत तिरंगी लढत होणार आहे. या निवडणुकीत ग्रामपंचायतीच्या सत्तास्थानी असलेली शिवसेना आपला गड कायम राखणार की सत्तांतर होणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
वळीवंडे गावच्या ग्रामपंचायतीत तीन प्रभागांमध्ये ग्रामपंचायत सदस्यांच्या सात जागा आहेत. सरपंचपद हे खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित असून, सरपंचपदासाठी चार उमेदवार रिंगणात आहेत. सदस्यपदाच्या सात जागांपैकी प्रभाग दोनमधील अनुसूचित जाती जमातीतील महिलांसाठी आरक्षित असलेल्या जागेवर आर. पी. आय. च्या वैशाली वळंजू या बिनविरोध निवडून आल्याने उर्वरित सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे, यासाठी अठरा उमेदवार रिंगणात आहेत.
प्रभाग एक मध्ये पोखरबांव या भागाचा समावेश असून प्रभागातील दोन जागांपैकी एक जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गातील पुरुषांसाठी आरक्षित आहे. या जागेवर शिवसेनेचे मिलिंद मोंडकर, समर्थ विकास पॅनेलचे महिंद्र तेली तर भाजपाचे सुहास मिठबांवकर रिंगणात आहेत. तर दुसरी जागा खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित आहे. या जागेवर भाजपाच्या संचिता सावंत, समर्थ विकास पॅनेलच्या सायली देसाई तर शिवसेनेच्या तेजस्विनी सावंत यांनी उमेदवारी दाखल केली आहे.
प्रभाग दोनमधील अनुसूचित जाती जमातीतील महिलांसाठी राखीव असलेल्या जागेवर आरपीआयच्या वैशाली वळंजू यांचा एकमात्र उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने व तो वैध ठरल्याने त्या बिनविरोध निवडून आल्या आहेत. याच प्रभागात नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव जागेवर समर्थ विकास पॅनेलच्या समिता तेली व भाजपच्या सविता तेली यांच्यात दुरंगी लढत होणार आहे. या प्रभागात बौद्धवाडी, कदमवाडी, मुस्लिमवाडी, तेलीवाडी आणि देसाईवाडी या भागांचा समावेश आहे.
प्रभाग तीनमध्ये सदस्यांच्या तीन जागा असून, या प्रभागात सावंतवाडी, घाडीवाडी, सुतारवाडी, डोबवाडी, टेमवाडी, इळकारवाडी या भागांचा समावेश आहे. खुल्या प्रवर्गातील पुरुषांसाठी असलेल्या दोन जागांसाठी शिवसेनेने गजेंद्र सावंत, राजेश घाडी, समर्थ विकास पॅनेलचे प्रवीण सावंत, जितेंद्र सावंत तर भाजपाने माजी सरपंच प्रकाश सावंत व सुरेश मिठबावकर यांना उमेदवारी दिली आहे. खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव जागेवर समर्थ विकास पॅनेलच्या सायली देसाई, भाजपाच्या समिक्षा घाडी व शिवसेनेच्या कल्पना सावंत यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.
वळीवंडे ग्रामपंचायत निवडणुकीत यापूर्वी शिवसेना व राष्ट्रीय काँग्रेस यांच्यात काँटे की टक्कर अशी लढत होत असे. ९ सप्टेंबर २०१७ रोजी शिवसेना व काँग्रेसमधील ८४ कार्यकर्त्यांनी माजी आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. त्यामुळे या निवडणुकीत भाजपाने पहिल्यांदाच उमेदवार रिंगणात उभे केल्याने निवडणूक तिरंगी होणार आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
विजयाकडे सर्वांचेच लक्ष
राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचे वळीवंडे हे होम पिच आहे. शिवसेना सोडून भाजपामध्ये गेलेले कार्यकर्ते, भाजपाने निवडणुकीत पहिल्यांदाच उभे केलेले उमेदवार, कोणत्याही पक्षांची एकमेकांशी नसलेली युती किंवा आघाडी यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाने प्रतिष्ठेची केलेली आहे. निवडणूक असून सध्या सत्ताधारी असलेली शिवसेना विजयाची घोडदौड कायम राखणार का? भाजपा पहिल्याच संधीत खाते खोलणार काय? समर्थ विकास पॅनेल जिल्हा परिषद निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढणार काय? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
वळीवंडे गावचे सरपंचपद उपसरपंच तसेच देवगड पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान पंचायत समिती सदस्य सदानंद देसाई यांच्या पत्नी प्रभाग एक व तीन मधून निवडणूक लढवित आहेत. शिवसेनेच्या माजी सभापती रेश्मा सावंत यांच्याही नेतृत्वाचा कस लागणार आहे.
सरपंचपदासाठीही तिरंगी लढत
सरपंचपदासाठी समर्थ विकास पॅनेलने शरयू सावंत, शिवसेनेने अर्चना घाडी तर भाजपाने पूजा घाडी यांना उमेदवारी दिली असून भाजपाने संचिता सावंत यांचा सरपंच पदासाठी डमी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे सरपंचपदासाठी तिरंगी लढत होणार असल्याची चिन्हे आहेत. या निवडणुकीत कोणत्याही पक्षाने एकमेकांशी युती अथवा आघाडी केलेली नसल्याने चुरशीच्या लढती होणार आहेत.