सावंतवाडीच्या नव्या ठाणेदारांना अवैध धंदे रोखण्याचे आव्हान
By अनंत खं.जाधव | Published: September 2, 2022 09:56 PM2022-09-02T21:56:48+5:302022-09-02T21:57:24+5:30
सावंतवाडी पोलीस निरीक्षक पदावरून सुनिल धनावडे यांची बदली झाल्यानंतर सावंतवाडी पोलीस निरीक्षक पदाची खुर्ची संगीत खुर्ची बनल्याचे दिसत आहे.
सावंतवाडी : सावंतवाडी पोलीस ठाण्याला अवघ्या एका वर्षातच नवीन प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्याकडे प्रभार देण्यात आला असून आता त्याच्या पुढे शहरांसह तालुक्यातील अवैध धंदे रोखण्या बरोबरच पोलीस कर्मचाऱ्यांत समन्वय राखण्याचे मोठे आव्हान असणार आहे. मात्र ते यात कितपत यशस्वी होतात हे बघणे सध्यातरी औत्सुक्याचे ठरणार असले तरी सावंतवाडी पोलीस निरिक्षकांची खुर्ची संगीत खुर्ची बनू नये अशीच अपेक्षा सर्वजणच व्यक्त करत आहेत.
सावंतवाडी पोलीस निरीक्षक पदावरून सुनिल धनावडे यांची बदली झाल्यानंतर सावंतवाडी पोलीस निरीक्षक पदाची खुर्ची संगीत खुर्ची बनल्याचे दिसत आहे. याचे कारण म्हणजे मागील तीन वर्षात या ना त्या कारणाने सावंतवाडीत पाच ते सहा प्रभारी अधिकारी येऊन गेलेत त्यात अधिकचा कालावधी मिळाला तो निवृत्त पोलीस निरीक्षक शशीकांत खोत यांच्यासह सध्या वाहतूक शाखेत बदली करण्यात आलेले शंकर कोरे यांना मात्र या दोघांच्या कालावधीत पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे,सचिन हुंदळेकर तसेच एस. चिंदरकर,राजेंद्र हुलावले आदिनी ही काहि दिवसांसाठी सावंतवाडी पोलीस निरीक्षकांच्या खुर्चीचा ताबा घेतला होता. पण गेल्या वर्षभरात पोलीस निरीक्षक म्हणून शंकर कोरे हे येथील पोलीस ठाण्यात कार्यरत होते.मात्र त्याच्या सह अगोदर असलेल्या खोत यांच्या कार्यकाळात मोठ्याप्रमाणात अवैध धंद्याचा सुळसुळाट झाल्याचे दिसून आले.स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडून सावंतवाडीत जुगार अड्ड्यावर धाडी टाकल्या खऱ्या मात्र यात सावंतवाडी पोलीस अधारतच राहिले असल्याचे दिसून आले.तर सावंतवाडी पोलीसांकडून दोन वेळा जुगार अड्ड्यावर कारवाई करण्यात आली मात्र ही कारवाई चांगलीच चर्चेत राहिली होती.
जुगार अड्ड्या प्रमाणेच अवैध दारू वाहतूक ही मोठ्याप्रमाणात सुरूच आहे. पण सावंतवाडी शहरात नाक्या-नाक्यावर अवैध दारूची होणारी विक्री तसेच काहि गावात राजरोस पणे सुरू असलेली दारू वाहतूक रोखणे हे नव्या पोलीस निरीक्षका पुढचे आवाहन असणार आहे. कारण मागील दोन वर्षांत अवैध धंद्याना मोकळा हात दिल्याने अनेक लहान लहान युवक थेट अवैध धंद्यात येऊ लागलेत.तसेच काहि नाक्यावर तर अवैध धंद्येवाईकाचा अड्डा च झाला होता.या
अवैध धंदेवाईकापुढे पोलिसाची खाकी ही कमी पडू लागली आहे कि काय असेच वातावरण शहरात पसरू लागल्याचे दिसून येत आहे.
ड्रग्ज गांजा यांचाही वापरही वाढू लागल्याने नवीन पिढीला यातून बाहेर काढण्याचे आवाहन ही पोलीसा समोर आहे.अवैध धंदेवाईकाचे छुपे अड्डेही पोलीसांना शोधून काढावे लागणार असून हे सर्व करत असताना नव्या पोलीस निरीक्षकांना कर्मचाऱ्यांना ही विश्वासात घ्यावे लागणार आहे तसेच त्याच्यात पुन्हा एकदा विश्वास निर्माण करावा लागणार आहे. त्यामुळे आता नवीन पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे कशा प्रकारे सावंतवाडीला पुढे घेऊन जात असतना अवैध धंद्याचा बिमोड कसा करणार हे बघावे लागणार आहे.