शाळांसमोर पटसंख्येचे आव्हान

By admin | Published: August 18, 2015 12:37 AM2015-08-18T00:37:50+5:302015-08-18T00:39:49+5:30

जिल्ह्यातील स्थिती : शासनाकडून पूरक सेवा पुरविणे गरजेचे

Challenges in front of schools | शाळांसमोर पटसंख्येचे आव्हान

शाळांसमोर पटसंख्येचे आव्हान

Next

वेंगुर्ले : सध्या केवळ सिंधुदुर्गातीलच नव्हे तर राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांसमोर मुलांची पटसंख्या टिकविण्याचे मोठे आव्हान आहे. २० मुलांच्या खाली शाळेची पटसंख्या आली तर ती शाळा बंद होऊन त्यामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नजिकच्या शाळेत सामावून घेतले जाते.
आज पालकही आपल्या मुलांच्या शिक्षणाबाबत जागरुक आहेत. पूर्वी एकदा का मुलाचे नाव पहिलीत दाखल केले की, चौथीनंतर एकदा शाळा बदलली की हायस्कूलमध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण नाममात्र खर्चात होत असे. परंतु आजच्या काळात पालकांची जागरुकता वाढली आहे. शासनाच्या धोरणानुसार मुलांच्या शालेय शिक्षणात पालकांचा सक्रीय सहभाग वाढला आहे. त्यानुसार प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये पालकांच्या शाळा व्यवस्थापन समित्या स्थापन केलेल्या आहेत. शाळा व्यवस्थापन समित्यांनी सजगपणे काम करण्याचे ठरविले तर अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम शाळांमध्ये राबविणे शक्य होते. पालकांचा हा अधिकार फक्त सरकारी शाळांमध्ये अस्तित्वात आहे. म्हणजे या शाळा खऱ्या अर्थाने ‘आपल्या’ आहेत. खाजगी किंवा संपूर्ण इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पालकांना असे काही ठरविण्याचा अधिकार नसतो. जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणायचा असेल तर सगळे शिक्षण पूरक उपक्रम, भौतिक सुविधा या सरकारतर्फेच पुरविल्या गेल्या पाहिजेत. या हट्टाग्रहातून आपण बाहेर पडले पाहिजे. लोकांच्या पुढाकाराने आणि देणगीदारांच्या सहाय्याने कित्येक शिक्षणपूरक उपक्रम राबविणे शक्य आहे.
ओझ्याविना शिक्षण ही विद्यार्थ्यांच्या हिताची संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी वेंगुर्ले येथील जिल्हा परिषदेच्या भटवाडी शाळा क्रमांक २ च्या शाळा व्यवस्थापन समितीने पुढाकार घेतला आहे. कोणत्याही शासकीय अनुदानाची वाट न पाहता शाळेचे माजी विद्यार्थी आणि देणगीदारांच्या सहयोगाने भटवाडी शाळा क्रमांक २ मध्ये अद्ययावत ३ संगणक संच असलेली कॉम्प्युटर लॅब, मुलांना अवांतर वाचनाची आवड लागण्यासाठी बालवाचनालय सुरु करण्यात आले आहे. याच सुधारणांचा पुढचा महत्वाचा टप्पा म्हणजे ‘ओझ्याविना शिक्षण’...!
भटवाडी शाळा क्रमांक २ च्या शाळा व्यवस्थापन समितीने मुलांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्याच्या दृष्टिने पुढाकार घेतला आहे. मुंबईतील संजय गोलतकर यांच्या आर्थिक सहकार्याने २४ लॉकर्स शाळांमध्ये बसविण्यात आले आहेत. या लॉकर्समध्ये मुलांची वह्या-पुस्तके, व्यवसायमाला, शिक्षणपूरक साहित्य सुरक्षित ठेवण्यात येते. जेवढी वह्या-पुस्तके आवश्यक आहेत. तेवढीच पुस्तके घरी नेण्यात येतात. महत्वाची आणि शाळेसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे ओझ्याविना शिक्षण ही संकल्पना राबविणारी सिंधुदुर्गातील पहिली प्राथमिक शाळा ठरली आहे.
पहिली ते चौथीच्या या शाळेमध्ये सेमी इंग्लिश प्रणालीनुसार विषय शिकविले जातात. कॉम्प्युटरचे प्राथमिक शिक्षणही मुलांना दिले जाणार आहे. आता थोडी जबाबदारी भटवाडी-वेंगुर्ले परिसरात राहणाऱ्या पालकांचीही आहे. केवळ संपूर्ण इंग्रजी माध्यमाच्या जाहिरातबाजीला न भूलता आपल्याच परिसरात मोफत आणि दर्जेदार शिक्षणाची संधी वाया दवडून चालणार नाही. दिवंगत शास्त्रज्ञ माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम, शास्त्रज्ञ जयंत नारळीकर, रघुनाथ माशेलकर यांनी मुलांचे प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच व्हावे असा आग्रह धरला आहे. कारण मातृभाषेतलेच शिक्षण मुलांची विचार करण्याची क्षमता आणि सृजनशीलता वाढविते. त्यामुळे आधुनिक भौतिक सोई-सुविधांनीयुक्त दर्जेदार शिक्षण देणाऱ्या भटवाडी सारख्या शाळा टिकविणे ही आपणा सर्वांचीच जबाबदारी आहे.
कॉम्प्युटर लॅब, प्रोजेक्टर स्क्रीन अशा सुविधा आणि नाविन्यपूर्ण उपक्रम वेंगुर्ले तालुक्यातील परबवाडा शाळा नं. २, केंद्रशाळा उभादांडा यांनी राबविल्या आहेत. केवळ पुस्तकी शिक्षणावर अवलंबून न राहता मुलांची विचार करण्याची क्षमता आणि कौशल्य वाढीला लागेल अशा प्रकारचे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मिळेल तेव्हा पालक आपल्या मुलांसाठी दुसरा पर्याय शोधणार नाहीत. (प्रतिनिधी)

Web Title: Challenges in front of schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.