कोकणात धुवाँधार पावसाची शक्यता; सिंधुदुर्गात रेड तर रायगड, रत्नागिरीत यलो अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 06:48 AM2024-07-08T06:48:47+5:302024-07-08T06:48:57+5:30
११ जुलैपर्यंत कोकणाला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगराला रविवारी सकाळी पावसाने धडकी भरविली असतानाच दुपारी, सायंकाळ मात्र कोरडी गेली, तर दुसरीकडे ठाणे, नवी मुंबई आणि रायगडमध्ये पावसाने धुवाँधार बॅटिंग केली असून, या पावसाचा जोर उत्तरोत्तर वाढत असल्याने सोमवारी दुपारी २ वाजेपर्यंत सिंधुदुर्गला रेड तर रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर, ११ जुलैपर्यंत कोकणाला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबईत सकाळी पावसाने बऱ्यापैकी जोर पकडला होता. सकाळी ९ वाजेपर्यंत पडणाऱ्या पावसामुळे मुंबईकरांचा रविवार पाण्यात जाईल, अशी भीती होती. प्रत्यक्षात मात्र सकाळी १० नंतर पावसाने मुंबईकडे पाठ फिरवली.
सायंकाळी ६ वाजेपर्यंत हवामान ढगाळ असेल तरी पावसाचा कुठेच पत्ता नव्हता. सिंधुदुर्गातील आवळेगाव येथे रविवारी दुपारी ३:४५ वाजेपर्यंत २३९ मिमी पावसाची नोंद झाली.
अत्यंत जोरदार पाऊस म्हणून या पावसाची नोंद झाली असून, नद्या-नाल्यांना पूर येईल. त्यामुळे स्थानिकांनी खबरदारी घ्यावी, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. तसेच मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे.
मोठ्या पावसाच्या नोंदी / मिमी
लोणावळा १२९
पनवेल १२१
कर्जत ११५
मुरबाड ११५
माथेरान २२०
मंडणगड (रत्नागिरी) १०५
संगमेश्वर (रत्नागिरी) १०२
लांजा (रत्नागिरी) १०२
राजापूर (रत्नागिरी) १३५
अंबोली (सिंधुदुर्ग) २३३