जिल्ह्यात दरवळणार चंदनाचा सुगंध

By Admin | Published: June 5, 2016 10:56 PM2016-06-05T22:56:33+5:302016-06-06T00:50:10+5:30

सामाजिक पर्यावरण मंडळ : चिपळुणात १२ रोजी कार्यशाळा

Chandana aroma in the district | जिल्ह्यात दरवळणार चंदनाचा सुगंध

जिल्ह्यात दरवळणार चंदनाचा सुगंध

googlenewsNext

चिपळूण : कोकणातील पहिल्या जंगलपेर अभियान चळवळीच्या यशस्वी आयोजनानंतर निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळ, महाराष्ट्रतर्फे रविवार, १२ जून रोजी सकाळी १०.३० वाजता पेढे येथील श्री परशुराम सानिध्य निसर्ग पर्यटन केंद्र येथे वैशिष्ट्यपूर्ण चंदन लागवड कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. चंदन हा सदाहरित वृक्ष असून, त्याच्या फांद्या सडपातळ, सरळ अथवा वाकड्या असतात. याची उंची साधारणपणे १२ ते १५ मीटर असून, घेर २ ते २.५ मीटरपर्यंत असतो. याची पाने सदाहरित, अंडाकार, टोकदार, समोरासमोर व देठाकडे निमुळती असतात. खोड लहान व कमी जाडीचे असते, तेव्हा मऊ असते. परंतु, जसजसे झाड मोठे होते, तसे त्याची साल खरबरीत व उभ्या चिरा असलेली बनत जाते. याचे लाकूड कठीण, सूक्ष्म दाणेदार कणांनी बनलेले तेलयुक्त असते. लाकडाचा बाहेरील भाग सफेद व सुगंधहीन असतो, तर आतील गाभा पिवळसर व तपकिरी असून, तो अतिशय सुगंधी असतो. चंदनाला जगभरात खूप मागणी असते. चंदनाचा भाव प्रतिकिलो ४ हजार ते ४५०० रुपये इतका आहे. २० वर्षे वाढलेल्या चंदनापासून २८ किलो लाकूड मिळते. एका हेक्टरमधून वीस वर्षांनंतर ६०० रोपांपासून ६ कोटी रुपयापर्यंत उत्पन्न मिळू शकते. चंदन तेलालाही राज्यात मागणी आहे. यातून चांगले उत्पन्नही घेता येऊ शकते.
चंदन लागवड कशी करावी? लागवडीची पूर्वतयारी, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन व चांगल्या चंदन वाढीसाठी घ्यावयाची काळजी यासंबंधी कार्यशाळेत माहिती दिली जाणार आहे. शेतीत व निवासी जागेत पूर्वतयारी करणाऱ्या सहभागी शेतकरी व पर्यावरणप्रेमींना चंदनाची रोपेही दिली आहेत. घागरे हे १९८५पासून चंदन शेती या विषयात कार्यरत आहेत. ४ लाख रोपांच्या नर्सरीपासून त्यांनी चंदन शेतीला सुरुवात केली होती.
कालांतराने बंगलोर येथील चंदन संशोधन संस्थेत जाऊन शास्त्रोक्त अभ्यास करुन चंदनतज्ज्ञ अशी ओळख निर्माण केली. पर्यावरणासाठी स्वत:ला वाहून घेतलेल्या घागरे यांच्या कामाला सन्मान म्हणून सोलापूर विद्यापीठाने त्यांना सिनेट सदस्यत्व बहाल केले आहे.
कोकणातील पर्यावरणप्रेमींना चंदन लागवडीसाठी प्रवृत्त करण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. मर्यादित प्रवेश असलेल्या या कार्यशाळेस उपस्थित राहू इच्छिणाऱ्यांनी श्री परशुराम सानिध्य निसर्ग पर्यटन केंद्र, पेढे परशुराम येथे संपर्क साधावा, असे आवाहन निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळ महाराष्ट्राचे राज्य उपाध्यक्ष विलास महाडिक व राज्य संघटक धीरज वाटेकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

चांगले अर्थार्जन : प्रतिकिलो ४ हजार दर
चंदनाला बाजारात चांगली मागणी असून, चंदनाच्या शेतीतून चांगले अर्थार्जन मिळू शकते. चंदनाचा भाव प्रतिकिलो ४ हजार ते ४ हजार ५०० इतका आहे. तसेच २० वर्षे वाढलेल्या चंदनापासून २८ किलो लाकूड मिळते. या वृक्षाची रत्नागिरी जिल्ह्यात लागवड होण्यासाठी निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांना याकडे वळविण्यात येणार आहे.

चंदनतज्ज्ञ उपस्थित
चिपळूण येथे होणाऱ्या या कार्यशाळेला चंदनतज्ज्ञ घागरे मार्गदर्शन करणार आहेत. १९८५ पासून ते चंदन शेती विषयात कार्यरत असून, त्यांनी ४ लाख रोपांच्या नर्सरीपासून चंदन शेतीला सुरूवात केली आहे. चंदनाची लागवड कशी करावी, याबरोबरच त्याच्या वाढीची माहिती ते देणार आहेत.

Web Title: Chandana aroma in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.