चोरून फोटो काढणाऱ्यास बदडले
By admin | Published: September 20, 2015 09:21 PM2015-09-20T21:21:00+5:302015-09-20T23:39:37+5:30
सार्वजनिक क्षेत्रातील तो अधिकारी मुंबई येथून बदली होऊन आला होता.
मालवण : शहरातील भरड नाक्यावरील एका चायनीज सेंटरमध्ये बसलेल्या युवतींचा चोरून फोटो काढणे एका सार्वजनिक क्षेत्राशी निगडीत असणाऱ्या अधिकाऱ्याच्या अंगलट आला. युवतींच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी त्या अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली. त्यावेळी चायनीज सेंटर मालकाने भाऊगिरीचा सल्ला देत भांडायचे असेल तर रस्त्यावर जावून भांडा असा सल्ला दिला. त्यावेळी त्या युवतींनी व हौशी नागरिकांनी त्या अधिकाऱ्यास रस्त्यावर आणून यथेच्छ बदडले. घटना शुक्रवारी रात्री घडली.
सार्वजनिक क्षेत्राशी संबंधित असणारा तो अधिकारी येथील चायनीज सेंटरमध्ये पार्सल नेण्यासाठी आला होता. पार्सलची आॅर्डर दिल्यावर त्याने लगतच्या टेबलवर बसलेल्या युवतींचे आपल्या मोबाईलवरून फोटो काढण्यास सुरुवात केली. त्या युवतींच्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी ताडकन उठून त्या अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली. त्यानंतर चायनीज मालकाने रस्त्यावर जावून भांडण्याचा सल्ला दिल्यावर त्या युवतींनी व तेथील हौशी नागरिकांनी तब्बल अर्धा तास बदडले. या युवतींनी प्रकरण न ताणता मनसोक्त धुलाई केल्याचे समाधान झाल्याने त्याला पोलिसात नेण्याचे टाळले. दरम्यान, चोरून काढलेले फोटो त्या युवतींनी तेथेच डिलीट केले. सार्वजनिक क्षेत्रातील तो अधिकारी मुंबई येथून बदली होऊन आला होता. शहरात दिवसभर या प्रकारची जोरदार चर्चा सुरु होती. (प्रतिनिधी)