शहरीकरणामुळे शिमगोत्सवात बदल
By admin | Published: March 11, 2015 10:34 PM2015-03-11T22:34:03+5:302015-03-12T00:08:49+5:30
नवी पिढी हायटेककडे : परंपरा, प्रथांकडे होतेय दुर्लक्ष
सुनील गोवेकर - आरोंदा -आपल्या जिल्ह्यात शिमगोत्सव उत्साहात साजरा करण्यात येतो. शेकडो वर्षांची ही परंपरा जतन करण्यात येत आहे आणि पूर्वांपार चालत आलेल्या आगळ््यावेगळ््या आणि पारंपरिक पद्धतीने शिमगोत्सव साजरा केला जात आहे; परंतु गेल्या दहा-पंधरा वर्षांचा विचार करता, वाढत्या शहरीकरणामुळे शिमगोत्सवामध्ये बदल झालेला दिसून येत आहे.
वाढत्या शहरीकरणामुळे आधुनिक विचारसरणीचा पगडा ग्रामीण भागातही पडल्याचे दिसून येत असून, याचा परिणाम शिमगोत्सवावर झालेला दिसत आहे. दहा - पंधरा वर्षांपूर्वी शिमगोत्सवात ग्रामीण भागात रात्रीच्यावेळी ढोल-ताशांच्या गजरात ‘रोंबाट’ हा प्रकार फार आवडीचा विषय असायचा. ढोल-ताशांचे वाद्य व त्यावर गाणी म्हणत (रोंबाट) नाचायचं आणि रात्रं जागवायची हा धुळवड होईपर्यंतचा कार्यक्रम असायचा. आता अलीकडच्या काळात मोबाईलच्या जमान्यात रात्रभर रोंबाट घालण्यात आपला वेळ न घालवता मोबाईल हाताळण्यातच अलीकडची पिढी व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रात्रीची परंपरा सुरू असली, तरी त्यातला उत्साह नवीन पिढीमध्ये दिसून येत नाही. काही भागांमध्ये पारंपरिक ढोल-ताशांची जागा आता बेंजोने घेतली असून, गाणे न म्हणता वाद्यावर फक्त नाचगाण्याचा शॉर्टकट उपाय अलीकडे प्रचलित झाला आहे.
दहा-पंधरा वर्षांपूर्वी राधा-कृ ष्ण, विविध वेशभूषा साकारत ‘शबय’ मागत गावातील घराघरांसमोर फिरणारे कितीतरी लोक दिसायचे आणि वेशभूषा साकारण्यासाठी बरेच दिवस मेहनत घेणारे कलावंतही दिसायचे. अलीकडच्या काळात मात्र शहरीकरणाबरोबरच हे प्रकार कमी दिसत आहेत. शहरीकरणामुळे छोट्या-छोट्या गावांतील लोक हे शहरी राहणीमान अंगिकारण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे जुन्या चालीरिती, परंपरा शिमगोत्सवामध्ये जपल्या जात असल्या, तरी नवीन पिढीला जुन्या परंपरा जतन करताना कमीपणा वाटत असल्याचे दिसून येते.काही वर्षांपूर्वी मळेवाड गावातील एक कलावंत बुधाजी मसूरकर हे शिमगोत्सव कालावधीत नाविन्यपूर्ण व्यक्तिरेखा साकारायचे. प्रत्येक वर्षी नवनवीन कल्पकता आणण्याचा त्यांचा कल असायचा. त्याबद्दल पणजी दूरदर्शनवर त्यांची मुलाखत घेऊन सन्मानही केला होता.
नव्या पिढीचा ओढा आधुनिकतेकडे
दहा-पंधरा वर्षांपूर्वी राधा-कृ ष्ण, विविध वेशभूषा साकारत. ‘शबय’ मागत. गावातील घराघरांसमोर फिरणारे कितीतरी लोक दिसायचे आणि एखादी वेशभूषा साकारण्यासाठी बरेच दिवस मेहनत घेणारे कलावंतही दिसायचे. अलीकडच्या काळात मात्र शहरीकरणाबरोबरच हे प्रकार कमी प्रमाणात दिसत आहेत. शहरीकरणामुळे छोट्या-छोट्या गावांतील लोक हे शहरी राहणीमान अंगिकारण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे जुन्या चालीरिती, परंपरा शिमगोत्सवामध्ये जपल्या जात असल्या, तरी नवीन पिढीला जुन्या परंपरा जतन करताना कमीपणा वाटत असल्याचे दिसून येत आहे.