अ‍ॅट्रॉसिटी कायदा बदलून दाखवाच

By admin | Published: January 9, 2017 12:36 AM2017-01-09T00:36:22+5:302017-01-09T00:36:22+5:30

जीवन भालेराव यांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान : सिंधुदुर्गनगरीतील बहुजन क्रांती मोर्चात प्रतिपादन

Changing the Atrocity Act | अ‍ॅट्रॉसिटी कायदा बदलून दाखवाच

अ‍ॅट्रॉसिटी कायदा बदलून दाखवाच

Next

सिंधुदुर्गनगरी : अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करा अशी मागणी करणे म्हणजे दलित समाजावर अत्याचार करण्यासाठीची मागणी आहे. हा कायदा म्हणजे आमचे संरक्षण कवच आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायदाच काय पण त्या अक्षरातील काना, मात्रा तरी बदलून दाखवाच असे खुले आव्हान बहुजन क्रांती मोर्चाचे संकल्पक जीवन भालेराव यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले. मराठा क्रांती मोर्चाला अनुसरून दलित बांधवांना प्रतिमोर्चा काढावा यासाठी लागणारा पैसा आम्ही देतो असे संघ परिवारामार्फत सांगून दलित विरूद्ध मराठा असा झगडा लावण्याचे कामही संघाच्यावतीने सुरू होते, असा आरोपही भालेराव यांनी केला.
रविवारी सिंधुदुर्गनगरी येथे बहुजन क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आरटीओ कार्यालयाच्या नजीक असणाऱ्या गोविंद सुपर मार्केट येथील मोकळ्या जागेत सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बहुजन क्रांती मोर्चाचे संकल्पक आणि क्रांती मोर्चाच्या आयोजन समितीचे राज्य सदस्य अहमदनगर येथील जीवन भालेराव हे बोलत होते.
यावेळी सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई शाखा वेंगुर्लेचे वाय. जी. कदम, सावित्रीबाई फुले विचार मंच सावंतवाडी अध्यक्षा सत्यशिला बोर्डे, युनायटेड बहुजन संघटना गोव्याचे दीपेश नाईक, शंकर जाधव, संघर्ष युवा मित्रमंडळ कणकवलीचे प्रकाश कांबळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समिती सिंधुदुर्ग सावंतवाडीचे लाडू जाधव, अजित जामसंडेकर, भिवा जाधव, राज्य मूळ रहिवासी महिला संघाच्या माया जमदाडे, सिताराम लांबर, प्रसाद जळवी आदी उपस्थित होते.
भालेराव म्हणाले, कोपर्डी घटनेनंतर मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात झाली. या घटनेतील आरोपींना फाशी द्या, मराठा आरक्षण द्या व ब. मो. पुरंदरे यांचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार काढून घ्या अशा तीन मागण्या होत्या. त्यानंतर अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी नव्याने करण्यात आली. पुरंदरे यांचा पुरस्कार काढून घ्या ही मागणी काढून घेण्याच्या अटीवर मराठा मुक्ती मोर्चाला मुख्यमंत्र्यांनी पूर्ण राज्यातील जिल्ह्यांमध्ये मोर्चा काढण्याची परवानगी दिली आणि तिथूनच पुरस्कार मागे घेण्याची अट मराठा मोर्चातून काढण्यात आली. अ‍ॅट्रॉसिटी कायदा म्हणजे आमची कवचकुंडले आहेत. त्यामुळे हा कायदा कधीच रद्द करू देणार नाही. हा कायदाच काय पण त्यावरील काना, मात्रा तरी बदलून दाखवा, असे आव्हान राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जीवन भालेराव यांनी दिले आहे. (प्रतिनिधी)
झगडा लावण्याचे संघाचे प्रयत्न
मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी सुरू झाल्यानंतर संघ परिवाराचे पदाधिकारी आमच्या बहुजन समाजाच्या पदाधिकाऱ्यांना येऊन भेटले आणि तुम्ही अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द होऊ नये यासाठी मराठा मोर्चाविरोधात मोर्चा काढा. आम्ही तुम्हाला पैसा, गाड्या, प्रचार, मीडिया आदी सर्व प्रकारची मदत करतो असे सांगत होते. यातून दलित विरूद्ध मराठा असा झगडा व्हावा आणि मराठा आरक्षणावरून लक्ष दूर जावे ही संघ व सरकार यांची नीती होती. मात्र आम्ही तो प्रस्ताव मान्य केला नाही, असेही भालेराव यांनी यावेळी सभेत स्पष्ट केले.

Web Title: Changing the Atrocity Act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.