प्रभारी उपअभियंता जाळ्यात
By admin | Published: February 5, 2015 11:19 PM2015-02-05T23:19:56+5:302015-02-06T00:38:26+5:30
‘लाचलुचपत’ची कारवाई : नळपाणी योजनेच्या मंजुरीसाठी दहा हजारांची लाच
राजापूर : तालुक्यात उग्र पाणीटंचाईचे संकट आ वासून उभे असताना याकडे साफ दुर्लक्ष करत ठेकेदाराने काम केलेल्या नळपाणी योजनेचे बिल मंजूर करण्यासाठी दहा हजारांची लाच घेतल्याप्रकरणी राजापूर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी उपअभियंता रामकृष्ण लक्ष्मण लठाड याला रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली; तर अन्य एका खासगी ठेकेदाराला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.राजापूर तालुक्यात एका नळपाणी योजनेचे काम सुरू असून, झालेल्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी राजापूर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी उपअभियंता रामकृष्ण लठाड याने ठेकेदाराकडून पाच टक्केप्रमाणे दहा हजारांची मागणी केली होती. लठाडने ‘ही रक्कम आणून दे व तुझे बिल घेऊन जा’, असा तगादा लावला होता. त्यानंतर संबंधित ठेकेदाराने याबाबतची तक्रार रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची खातरजमा केली.गेले दोन दिवस ‘लाचलुचपत’चे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सापळा रचला होता. मात्र, लठाड हा कार्यालयात नव्हता. त्यामुळे कार्यवाहीला वेळ लागत होता. गुरुवारी (दि. ५) तो आपल्या कार्यालयात दाखल झाल्यानंतर दुपारी ३.३० च्या दरम्यान संबंधित ठेकेदार दहा हजारांची रक्कम घेऊन त्याच्याकडे गेला व ती रक्कम लठाड याला दिली. मात्र, चौकशी सुरू असताना अशी कोणत्या प्रकारची रक्कम रामकृष्ण लठाडकडे आढळून आली नाही.
अनेक वर्ष कारभार
‘लाचलुचपत’ विभागाने पकडलेला रामकृष्ण लक्ष्मण लठाड हा गेली अनेक वर्षे राजापूर ग्रामीण पाणीपुरवठा विभागात शाखा अभियंता म्हणून कार्यरत असून, मागील काही महिन्यांपासून त्याच्याकडे उपअभियंता पदाचा कार्यभार होता.