कणकवलीत साचेबद्धता टाळणाऱ्या गप्पा-टप्पा
By admin | Published: October 4, 2015 10:27 PM2015-10-04T22:27:38+5:302015-10-04T23:34:57+5:30
‘आम्ही मैत्रिणी’ ग्रुप : सुस्थापितांनी व्यक्त होण्यासाठी जोपासला छंद
कणकवली : तुम्ही नोकरी करता? हो सर्वच करतात. पण मग तुम्ही वेगळे काय करता? या प्रश्नाला उत्तर देताना आणि स्वचा शोध घेताना आपापल्या क्षेत्रात सुस्थापित युवकांनी ‘गप्पा-टप्पा’चा कविता-गाण्यांच्या सादरीकरणाचा मार्ग निवडला. कणकवलीतील ‘आम्ही मैत्रिणी’ गु्रपचाही हा आयोजनातील पहिलाच प्रयत्न होता.
येथील वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात शनिवारी हा कार्यक्रम झाला. आदित्य बर्वे, केदार फडके, अंबरीश देशपांडे, प्रतीक रानडे, विनीत देशपांडे आदींचा हा ग्रुप आहे. यातील फक्त आदित्य बर्वे हा पेशाने संगीतकार, गिटारवादक आहे. काही चित्रपट, मालिकांसाठी त्याने काम केले आहे. इतरांमध्ये कोणी सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे तर कोणी ग्राफिक डिझायनर म्हणून कार्यरत आहे. मात्र, सर्वांनी कलाक्षेत्रातील आपली आवड जोपासण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. स्वत:मधील कलेला वाव देताना या मित्रांनी सन २००८पासून ‘बरस रे’ नावाचा कार्यक्रम सुरू केला. तो टिपीकल गीतगायनाचा कार्यक्रम होता. त्यानंतर अंबरीश देशपांडे याने स्वत:चे कविता लेखन सुरू केले. त्याचे ‘शब्दात माझ्या’ आणि ‘नाते शब्दाचे’ असे दोन कवितासंग्रह आहेत. यानंतर मागील वर्षी एप्रिलमध्ये ‘गप्पा-टप्पा’ या कार्यक्रमाचा जन्म झाला. आतापर्यंत या कार्यक्रमाचे पंधराहून अधिक शो झाले आहेत.
आदित्य बर्वे म्हणाला की, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला हवे तसे व्यक्त होता येते. संगीताबद्दल प्रयोग करता येतात जे सिनेमात करता येत नाहीत. गिटार-तबला, संवादिनी-गिटार असेही फ्यूजन होते. केदार फडके म्हणाला की, कार्यक्रमाचे वेगळेपण म्हणून आम्ही फेसबुकवरून रसिकांशी संपर्क करून त्यांच्या आवडी -निवडीवरून कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्याचाही प्रयोग केला.
या ग्रुपमधील बहुतेक जण आपली नोकरी-धंदा सांभाळून काम करतात. त्यामुळे बहुतांश शनिवार-रविवारी कार्यक्रम घ्यावा लागतो. तसेच ग्रुपमधील कलाकारही त्याप्रमाणे बदलतात, असे फडके यांनी सांगितले. नोकरी-व्यवसाय सांभाळून शो करताना कसरत होते. परंतु, कलेच्या सादरीकरणाचा फायदा आम्हाला आमच्या क्षेत्रात काम करतानाही होतो, असे संवादिनी वादक केदार फडके याने सांगितले. (प्रतिनिधी)
संविता आश्रमाला मदत देणार : हर्षा दीक्षित
हा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या येथील ‘आम्ही मैत्रिणी’ ग्रुपचा हा पहिलाच प्रयत्न होता. गु्रपच्या हर्षा दीक्षित, वैशाली गणपत्ये, प्रीती करंबेळकर, अनुश्री जोशी, मानसी आपटे, अमृता मराठे, श्रेया मराठे आदी मैत्रिणींनी सांस्कृतिक कार्यक्रमातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न आहे. या कार्यक्रमातून जमा होणाऱ्या निधीचा काही भाग ‘संविता आश्रम’ या संस्थेला देणार असल्याचे सांगितले. यापुढेही वेगळ्या प्रकारचे कार्यक्रम सादर करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे गु्रपच्या हर्षा दीक्षित म्हणाल्या.