युतीसाठी केसरकरांचे चव्हाण यांना साकडे
By admin | Published: January 5, 2017 11:50 PM2017-01-05T23:50:58+5:302017-01-05T23:50:58+5:30
आरोसबाग पुलाचे भूमिपूजन : चूक टाळण्याचे आवाहन
बांदा : शिवसेना-भाजप हे नगरपालिका निवडणुकीत एकत्र न आल्याचा फटका हा आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतही बसू नये, यासाठी युती होणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी वरिष्ठ पातळीवर दोन्ही पक्ष प्रयत्नशील आहेत. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आपण इथले भाजपचे ‘इनचार्ज’ आहात, त्यामुळे आपण आपल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना युती करण्यासाठी राजी करा, असे साकडे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृह व वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी घातले. येथील तेरेखोल नदीपात्रावरील बांदा-आरोसबाग पुलाच्या कार्यारंभप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, प्रदेश सरचिटणीस राजन तेली, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद कामत, पंचायत समिती सदस्या श्वेता कोरगावकर, स्वप्निल नाईक, माजी जिल्हाध्यक्ष विजयकुमार मराठे, श्यामकांत काणेकर, शेर्ले सरपंच उदय धुरी, अशोक दळवी, बांदा सरपंच मंदार कल्याणकर, सावंतवाडीचे नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, बाळा आकेरकर, शीतल राऊळ, राजू राऊळ, आदी उपस्थित होते. यावेळी राज्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते कलशपूजन करण्यात आले. त्यानंतर मंत्री रवींद्र चव्हाण व मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते तेरेखोल नदीपात्रात जलपूजन करण्यात आले.
यावेळी मंत्री केसरकर म्हणाले की, आरोसबाग पुलाचा प्रश्न हा जनतेच्या जिव्हाळ्याचा आहे. आघाडी शासनाच्या कार्यकाळात रखडलेला हा पूल पुन्हा युती शासनाच्या कार्यकाळात पूर्णत्वास येत आहे. नाबार्डमधून या पुलासाठी खास निधीची तरतूद करण्यात आली आहे. यावेळी अतुल काळसेकर, संजय चांदेकर यांनी विचार मांडले. कार्यकारी अभियंता बच्चे पाटील यांनी पुलाचा आराखडा सांगितला. तसेच जून २0१८ पर्यंत पुलाचे बांधकाम पूर्ण होणार असल्याचे सांगितले. मंदार कल्याणकर, शीतल राउळ, सनी काणेकर यांनी स्वागत, तर रूपाली शिरसाट यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
काळसेकरांची समजूत घाला : केसरकर
दीपक केसरकर यांनी भाषण करताना आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत युती होण्याबाबत त्यांनी रवींद्र चव्हाण यांना अतुल काळसेकरांची समजूत घालण्यासाठी भर व्यासपीठावरच साकडे घातले. बांदा जिल्हा परिषद व दोन्ही पंचायत समित्यांवर काळसेकर हे भाजपचा दावा करीत असल्याने आपण त्यांची जरा समजूत घालावी, अशी कोपरखळी त्यांनी काळसेकरांना लगावली. अतुल काळसेकर हे सर्वच जागांवर दावा करीत असल्याने आम्ही जगायचे कसे, असा सवाल त्यांनी करताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.