सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलावंतांना संधी देणार : चव्हाण
By admin | Published: June 6, 2014 12:08 AM2014-06-06T00:08:43+5:302014-06-06T00:09:39+5:30
रामचंद्र कुडाळकर ल्ल तळवडे : सिंधुदुर्ग जिल्हा हा कलावंतांचा जिल्हा आहे.
रामचंद्र कुडाळकर ल्ल तळवडे
सिंधुदुर्ग जिल्हा हा कलावंतांचा जिल्हा आहे. या जिल्ह्यातील नाट्यकर्मी व इतर क्षेत्राची आवड असणार्या कलावंताना दूरदर्शन मालिका किंवा इतर क्षेत्रात काम करण्याची सुवर्णसंधी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कलावंताना हिंदी तसेच दूरदर्शन मालिकेत काम करण्याची सुवर्णसंधी मिळवून देणार असल्याचे मत निर्माता अनिल चव्हाण यांनी व्यक्त केले.
ते चित्रपटाच्या चित्रीकरणाचा अभ्यास करण्यासाठी सिंधुदुर्गात आले असता ‘लोकमत’शी बोलत होते.
अनिल चव्हाण हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. ते फिल्मनिर्माता आहेत तसेच अनेक मालिका त्यांनी तयार केल्या आहेत. त्यांचे शिक्षण वेंगुर्ले तालुक्यातील खर्डेकर महाविद्यालयात झाले असून मुंबईला गेल्यावर ते फिल्म उद्योगात उतरले.
या क्षेत्रात त्यांनी बरेच परिश्रम केले. त्यांनी आतापर्यंत सह्याद्री वाहिनीवरील रंगबहार, मनोरंजन, दुर्गा, अग्निपरिक्षा तसेच मी मराठी वाहिनीवरील 'एक झोका नियतीचा' या दर्जेदार मालिकांची निर्मिती केली. मराठीतील नामवंत दिग्दर्शक पितांबर काले यांनी चाळीसच्यावर चित्रपटाचे दिग्दर्शन केले. त्यांना घेऊन मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. या चित्रपटात वेंगुर्लेतील नाट्य अभिनेत्री शोभा मांजरेकर मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे.
या मराठी व हिंदी कलाकारांसोबत काम करण्याची संधी कोकणातील कलाकारांना प्राप्त होणार आहे, त्याचप्रमाणे हिंदी मालिकेच्या कथापटकथेवर काम सुरु आहे. दूरदर्शनच्या प्राथमिक मान्यतेनंतर मुंबई, कोल्हापूर, कोकण व गोवा येथे मालिकेच्या चित्रीेकरणाला प्रारंभ होणार आहे. या मालिकेत कोकणातील नामवंत कलाकार जया गोरे, वासुदेव जंगम, शोभा मांजरेकर, गिताली मातोंडकर, सुजाता शेलटकर, वृंदा केळकर या कलाकारांना काम करण्याची संधी मिळणार आहे.
निर्माता अनिल चव्हाण यांचा सिनेक्षेत्रातील प्रवास विलक्षण आहे. कोणाच्याही मदतीचा हात न घेता किंवा पाठबळ नसताना केवळ स्वत:वरील आत्मविश्वास व जिद्द याच्या जोरावर व देवावरील श्रद्धा, जे काम करायचे ते प्रमाणिकपणे अशी त्यांची मनोवृत्ती आहे. त्यांनी शून्यातून विश्वनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कोकणातील श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी चित्रपटात कोकणातील अनेक कलाकारांना काम करण्याची संधी उपलब्ध करुन दिली. त्याचप्रमाणे या चित्रपटात त्यांनी कार्यकारी निर्माताची भूमिका बजावली.
या मालिकेच्या निर्मितीमुळे येथील जिल्ह्यात स्थानिक कलावंताना काम करण्याची संधी मिळाली असून इथल्या पर्यटन विकासालाही मोलाचे सहकार्य मिळणार आहे. येथील पर्यटन विकासाला विविध चित्रपट, मालिका यांच्या शूटिंंगमुळे चालना मिळणार आहे.