खासदारांच्या नावाने फसवणूक
By Admin | Published: January 28, 2017 10:48 PM2017-01-28T22:48:26+5:302017-01-28T22:48:26+5:30
खोटी निविदा बनवली : म्होरक्या संतोष नारायणकरला राजस्थानात अटक
रत्नागिरी : खेड तालुक्यातील साखरोळी गावातील १० कामांसाठी सुमारे १ कोटी ७० लाखांची निविदा तयार करून त्यावर खासदार अजय संचेती यांची खोटी सही करून ती निविदा जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करुन शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार १५ मार्च २०१६ रोजी उघड झाला होता. या प्रकरणातील म्होरक्या संतोष दगडू नारायणकर याला रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने राजस्थान येथे जेरबंद केले़ शनिवारी त्याला न्यायालयात हजर केले असता, ३ फेब्रुवारीपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़
शांताराम गणपत देशमुख (रा. गोडावून स्टॉप, रत्नागिरी) हे जिल्हाधिकारी कार्यालयात संशोधन सहाय्यक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत़ १५ मार्च रोजी संतोष नारायणकर याने जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे खासदार अजय संचेती यांच्या नावाचा आपल्या स्वार्थासाठी वापर केला़ त्यांच्या नावे खोटा दस्तऐवज तयार करून खासदार संचेती यांचे खोटे लेटरहेड तयार केले व त्याद्वारे खेड तालुक्यातील साखरोळी गावातील १० कामांची सुमारे १ कोटी ७० लाख रुपयांची निविदा तयार करून त्यावर खासदारांची खोटी सही केली़ हा खोटा दस्तऐवज शासकीय कामात वापरण्याचा प्रयत्न त्याने केला. परंतु, जिल्हाधिकारी कार्यालयातील चाणाक्ष कर्मचाऱ्यांमुळे हा प्रकार उघडकीस आला होता़ परंतु, तेव्हापासून संतोष नारायणकर हा फरार झाला होता़
रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा पथकाला संतोष हा राजस्थान येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती़ त्यामुळे पोलीस अधीक्षक प्रणय अशोक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तुषार पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्री गायकवाड व पोलीस निरीक्षक काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक राजस्थान येथे सहा दिवसांपूर्वी रवाना करण्यात आले होते़ गेले सहा दिवस सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन ढेरे व त्यांचे पथक संतोष नारायणकर याच्या मागावर होते़ शुक्रवारी गुन्हे प्रकटीकरणच्या पथकाने संतोष याला सापळा रचून राजस्थान येथे शिताफीने अटक केली.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, पोलीस नाईक प्रवीण खांबे, पोलीस कॉन्टेबल भैरवनाथ सवाईराम, राहुल घोरपडे, पोलीस नाईक उमेश गायकवाड, दीपक जाधव, पोलीस शिपाई महेश पाटील यांनी केली तर यासाठी तांत्रिक मदत रमिज शेख यांनी केली़ (वार्ताहर)
मुंबईतही फसवणुकीचा प्रयत्न
संतोष नारायणकर याने रत्नागिरीसह मुंबई येथेही अशाच प्रकारची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला होता़ त्यामुळे मुंबईतही त्याच्याविरोधात गुन्हा दाखल असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे़ त्याच्या अटकेनंतर अजून काही गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे़ नारायणकर याची सध्या कसून चौकशी सुरु असून, त्यातून अनेक बाबी पुढे येण्याची शक्यता आहे.