Sindhudurg- बांदा येथील तपासणी नाका उद्यापासून सुरू होणार, बेकायदा वाहतुकीला चाप बसणार 

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: March 31, 2023 12:46 PM2023-03-31T12:46:40+5:302023-03-31T12:46:57+5:30

वाहनांचे पूर्ण स्कॅनिंग होणार 

Checkpoints at Sindhudurg-Banda will start from tomorrow, illegal traffic will come under pressure | Sindhudurg- बांदा येथील तपासणी नाका उद्यापासून सुरू होणार, बेकायदा वाहतुकीला चाप बसणार 

Sindhudurg- बांदा येथील तपासणी नाका उद्यापासून सुरू होणार, बेकायदा वाहतुकीला चाप बसणार 

googlenewsNext

बांदा (सिंधुदुर्ग) : तब्बल १५ वर्षे वादाच्या भोव-यात सापडलेला बांदा येथील सीमा तपासणी नाका अखेर उद्यापासून सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात आरटीओ व राज्य उत्पादन शुल्क खात्याचे नाके या ठिकाणी सुरू होणार आहेत. त्यानंतर अन्य नाकी सुरू होणार आहेत. याबाबतचे आदेश आयुक्तांनी काढले आहे.याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांनी दुजोरा दिला आहे. 

या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाची नुकतीच बैठक घेऊन नाका सुरू करण्यासंदर्भात आदेश देण्यात आले आहेत. हा अत्याधुनिक सीमा तपासणी नाका असल्याने या नाक्यावर परराज्यातून येणाऱ्या वाहनांना आता तपासणी करूनच राज्यात प्रवेश मिळणार आहे. गेली १५ वर्षे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला हा सीमा तपासणी नाका आता सुरु होणार असल्याने बेकायदा व ओव्हरलोड वाहतुकीला चाप बसणार आहे. 

गेले अनेक वर्षे विविध कारणांनी हा तपासणी नाका वादात सापडला होता. सुरुवातीला गणेश चतुर्थी कालावधीत तपासणी नाका सुरु कारण्याच्या हालचाली होत्या. मात्र त्यानंतर दिवाळीचा मुहूर्त ठरविण्यात आला होता. तपासणी नाका सुरु होण्याच्या पार्श्वभूमीवर व कालावधी कमी असल्याने येथील सर्व कामे जलदगतीने पूर्ण करण्यात आली होती. हा अत्याधुनिक तपासणी नाका असल्याने याठिकाणी प्रशासकीय तांत्रिक बाबींबरोबरच प्रवाशांना देखील सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. 

राज्यात सीमेवर ठिकठिकाणी २२ तपासणी नाके 

राज्याच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने राज्यात सीमेवर ठिकठिकाणी अत्याधुनिक २२ तपासणी नाके उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये बांदा-सटमटवाडी येथील तपासणी नाक्याचा देखील समावेश आहे. मंजुरी मिळाल्यानंतर २००७ मध्ये प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली. मात्र तपासणी नाक्यासाठी ३२ एकर क्षेत्र संपादित करण्यात आल्याने स्थानिक भूमिपुत्रांनी प्रचंड विरोध करत प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. शासनाने बळाचा वापर करत पोलीस बंदोबस्तात भुसंपादन व सीमांकन प्रक्रिया पूर्ण केली होती.

नाक्याच्या विरोधात हरित लवाद व सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल असल्याने तपासणी नाक्याचे काम गेली अनेक वर्षे रखडले होते. न्यायालयीन मार्ग मोकळा झाल्याने हा तपासणी सुरु करण्याबाबत राज्य शासनाकडून हालचाली सुरु करण्यात आल्या. ठेकेदार कंपनीला लवकरात लवकर नाका सुरु करण्यासाठी काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते. 

२४ तास सेवा

मात्र मागील वर्षात ३ वेळा मुहूर्त साधूनही तपासणी नाका सुरु न झाल्याने नाका सुरु होण्याबाबत साशंकता होती. या नाक्यावर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), पोलीस, वनविभाग, उत्पादन शुल्क, महसूल, दहशतवाद विरोधी पथक तसेच अमली पदार्थ विरोधी पथक अशा सात विभागाचे कर्मचारी २४ तास सेवा बजाविणार आहेत. 

वाहनांचे पूर्ण स्कॅनिंग होणार 

हा अत्याधुनिक तपासणी नाका असून या नाक्यावरून प्रवास करणारे वाहन हे डिजिटल स्कॅनिंग होऊन बाहेर पडणार आहे. यामुळे दारू वाहतूक, अमली पदार्थ वाहतूक याची तात्काळ माहिती मिळण्यास मदत होणार आहे. महामार्गाच्या दुतर्फा दोन्ही मार्गांवर नाका उभारण्यात आला आहे. अधिकारी व कर्मचारी यांच्या निवासासाठी संकुल उभारण्यात आले आहे. याठिकाणी सात विभागाचे कार्यालय होणार असल्याने प्रत्येक इमारतीला खात्यानुसार नावे देखील देण्यात आली आहेत. महामार्गावर इन्सुली खामदेव नाका तर गोव्यातून प्रवेश करताना पत्रादेवी येथून पुढे तपासणी नाका आहे. याठिकाणी वाहनाकडून कोणताही टोल आकरण्यात येणार नाही. 

व्यावसायिक व मालवाहक वाहनांकडून टोल 

मात्र व्यावसायिक व माल वाहक वाहनांकडून मालाच्या वजनानुसार टोल आकारण्यात येणार आहे. हलकी व्यावसायिक वाहने ज्यांचे वजन साडेसात मेट्रिक टन असेल त्यांच्याकडून ४७ रुपये २० पैसे, मध्यम व्यावसायिक वाहने ज्यांचे वजन साडेबारा मेट्रिक टन असेल त्यांच्याकडून ९४ रुपये ४० पैसे, जड व अतिजड व्यावसायिक वाहने ज्यांचे वजन १२ मेट्रिक टनच्या पुढे असेल त्यांच्याकडून १८८ रुपये ८० पैसे टोल आकारण्यात येणार आहे. यातून कृषी मालाची वाहतूक करणाऱ्या तसेच शासनाच्या संरक्षण विभागाची वाहने यांना सवलत देण्यात आली आहे. 

Web Title: Checkpoints at Sindhudurg-Banda will start from tomorrow, illegal traffic will come under pressure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.