रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात केमोथेरपी केंद्र सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 04:27 PM2018-07-10T16:27:46+5:302018-07-10T16:33:01+5:30
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात केमोथेरपी केंद्र सुरू करण्याच्या भाजपचे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. या निर्णयामुळे सिंधुदुर्गातील रुग्णांबरोबरच नातेवाईकांची फरफट टळण्यास मदत होणार आहे.
सिंधुदुर्ग : कोकणातील एका जिल्ह्यात केमोथेरपी केंद्र सुरू करण्याच्या भाजपचे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. या निर्णयामुळे सिंधुदुर्गातील रुग्णांबरोबरच नातेवाईकांची फरफट टळण्यास मदत होणार आहे.
कोकणातील रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाबरोबरच राज्यातील 11 जिल्हा रुग्णालयात केमोथेरपी केंद्र लवकरच सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात राज्यातील दहा जिल्हा रुग्णालयात केमोथेरपी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यात कोकणातील एकाही जिल्ह्याचा समावेश करण्यात आला नव्हता. त्यामुळे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी आरोग्य मंत्री दिपक सावंत यांची 2 मे रोजी तातडीने भेट घेऊन लक्ष वेधले होते.
तसेच कोकणात केंद्र सुरू करण्याचा आग्रह धरला होता. त्यावेळी आरोग्यमंत्र्यांनी सिंधुदुर्गात केंद्र सुरू करण्यासाठी तांत्रिक अडचणी दूर केल्या जात असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, त्या अडचणी दूर न झाल्यामुळे अखेर रत्नागिरीत केंद्र सुरू केले जाणार आहे.
रत्नागिरीबरोबरच राज्यातील 11 ठिकाणी टाटा मेमोरियल हॉस्पीटलच्या सहकार्याने केमोथेरपी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी सोमवारी विधानसभेत विचारलेल्या तारांकित प्रश्नात ही माहिती देण्यात आली.
कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमधील जिल्हा रुग्णालयात केमोथेरपी केंद्र नसल्यामुळे कर्करोग रुग्णांना केमोथेरपीच्या उपचारासाठी मुंबईला जावे लागते. मुंबईतील टाटा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांबरोबरच नातेवाईकांचेही अतोनात हाल होतात. त्यात त्यांचा बराच वेळ व पैसाही नाहक खर्च होतो.
ठाणे व पालघर जिल्ह्यातील रुग्ण साधारणतः चार तासांत मुंबईला पोचू शकतात. मात्र, कोकणातील रुग्णांना किमान सहा ते 13 तासांचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील रुग्णांच्या सोयीच्या दृष्टीने पहिल्या टप्प्यात कोकणातील एका जिल्हा रुग्णालयात केमोथेरपी केंद्र सुरू करावे, अशी आग्रही मागणी आमदार डावखरे यांनी केली होती.