पहाटे ३.३० ची वेळ, पोलीस बंदोबस्त अन् कमालीची गोपनियता; कणकवलीतील शिवाजी महाराजांचा पुतळा अखेर स्थलांतरित!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 09:48 AM2022-07-09T09:48:58+5:302022-07-09T09:52:00+5:30
मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणात बाधित होत असलेला कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा सर्व्हिस रोडवर असलेला पुतळा स्थलांतर करण्यात आला आहे.
कणकवली :
मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणात बाधित होत असलेला कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा सर्व्हिस रोडवर असलेला पुतळा स्थलांतर करण्यात आला आहे. शनिवारी पहाटे साडेतीन वाजता ही कार्यवाही करण्यात आली. हा पुतळा कणकवली नगरपंचायत मध्ये ठेवण्यात आल्याचे समजते.
छत्रपतींच्या पुतळ्याच्या स्थलांतरणाकरिता प्रशासकीय यंत्रणा रात्री बारा वाजल्यापासून सज्ज ठेवण्यात आली होती. अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बागाटे यांनी या परिस्थितीचा आढावा शुक्रवारी संध्याकाळी घेतला होता. सर्व्हीस रोड वरील पुतळा हटविण्याकरता पुरेसा कामगार वर्ग व जेसीबी, ट्रॅक्टर देखील कार्यरत ठेवण्यात आला होता. नगरपंचायत मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्या उपस्थितीत पोलीस बंदोबस्तात हा पुतळा स्थलांतरीत केल्याचे समजते. गेली तीन वर्षे या पुतळ्याच्या मुद्द्यावरून राजकारण रंगले होते. मात्र याबाबत कोणताही मार्ग निघत नव्हता. नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी या पुतळ्याच्या स्थलांतरण करिता सर्वपक्षीय बैठकही आयोजित केली होती. माजी पालकमंत्र्यांनी आश्वासने दिली मात्र त्याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. मात्र त्यानंतर नुकताच छत्रपती शिवाजी महाराज चौकात नव्याने पुतळा स्थापन केल्यानंतर या जुन्या पुतळ्याच्या स्थलांतरणाचे काय? हा प्रश्न निर्माण झाला होता. आमदार वैभव नाईक यांनी काल या पुतळ्याला शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केल्यानंतर या पुतळ्याच्या स्थलांतरणाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना प्रशासन योग्य भूमिका घेईल व प्रशासनाच्या भूमिकेला आमचा पाठिंबा असेल असे सांगितले होते.
तसेच उदय सामंत व संदेश परकर यांनी पुतळा स्थलांतरणा करिता बैठका घेतल्या. त्यामुळे पुतळ्याला लवकरच चांगली जागा मिळावी यासाठी आमचा पाठपुरावा असेल असे ही श्री. नाईक यांनी सांगितले होते. तर कणकवलीत रात्रीचे कार्यक्रम चालतात असे सांगत शिवसेना नेते संदेश पारकर यांनी कुणावर नाव न घेता टीका केली होती. दरम्यान या पुतळ्याच्या स्थलांतरणासंदर्भात प्रशासकीय पातळीवर प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी शुक्रवारी सायंकाळी प्रमुख अधिकारी व नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या सोबत आढावा घेतला. पण याबाबतची माहिती मात्र गुप्त ठेवण्यात आली होती. अखेर आज शनिवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा पुतळा हटवून तिथे पुतळ्याच्या भोवती असलेली बॅरिकेट व साहित्य हटविण्यात आले.
गेली तीन वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावण्यात आला. या घटनेमुळे आठ गुंठे शासकीय जागेतील दुकाने हटवून त्या ठिकाणी पुतळ्याचे विस्तारीकरण करत या दुकानदारांना त्या आठ गुंठे जागेमधून शिफ्ट करण्याचा देखील प्रश्न निकाली निघाल्याचे बोलले जात आहे. तसेच राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर योगायोगाने तीन वर्षांनी हा प्रश्न निकाली निघाल्याचे ही बोलले जात आहे. आमदार नितेश राणे यांनी या प्रश्नी इशारा दिला होता तो अखेर सत्यात आल्याचे पाहायला मिळत आहे . एकूणच या वर आता यापुढे शिवसेनेची भूमिका काय असणार? ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे.