छोटुकल्या गौरीची ‘तायक्वाँदो’त राष्ट्रीय पातळीवर भरारी
By admin | Published: January 19, 2016 10:58 PM2016-01-19T22:58:00+5:302016-01-19T23:37:47+5:30
लहानपणीची आवड
मेहरून नाकाडे --रत्नागिरी -घराच्या शेजारी असलेल्या प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्याना सराव करताना पाहून आपणही असं काहीतरी करावं असं गौरीला वाटू लागलं. इयत्ता दुसरीत शिकत असतानाच गौरी शाळा सुटल्यानंतर प्रशिक्षण केंद्रात जाऊ लागली. हात व पायाद्वारे लढण्याची कला म्हणजे तायक्वाँदो ! मात्र, यातील विविध कीक्स महत्त्वाच्या असून सरावाअंती ते छान जमते. गौरीतील आवड पाहून प्रशिक्षक मिलिंद भागवत यांनी तिला विविध प्रकार शिकविले. स्वत:ला थोडे फार जमू लागल्यावर गौरीने घरी आई-बाबांना सांगून प्रशिक्षण केंद्रात प्रवेश घेतला. शालेय, जिल्हा, विभागीय, राज्य, राष्ट्रीयस्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होऊन अवघ्या दहा महिन्यात तिने चार सुवर्णपदके मिळवली आहेत.
गौरी शैलेश कीर सध्या सेक्रेड हार्ट कॉन्व्हेट स्कूल, उद्यमनगर येथे इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकत आहे. शालेय शिक्षणाबरोबर आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत गौरी सहभागी होते. तिने धावण्याच्या स्पर्धेत रौप्य, तर लंगडीमध्ये कांस्यपदक पटकावले आहे. मात्र, तिला सर्वाधिक आवड आहे ती तायक्वाँदोची! दुपारी १२.५० ते सायंकाळी ५.३० पर्यंत शाळा झाली की, घरात येऊन फ्रेश झाल्यानंतर ती लगेच तायक्वाँदो प्रशिक्षणाला पळते. सायंकाळी ६.१५ ते ७.३० पर्यंत तिचा दररोज सराव सुरू असतो. स्पर्धा जवळ आली की, सरावाच्या वेळेत वाढ होते. रविवार अथवा सुटीच्या दिवशीही ती न कंटाळता सरावासाठी हजर असते. सध्या गौरी आठ वर्षांची आहे. सात वर्षांची असताना तिने सराव सुरू केला.
जाकादेवी येथे झालेल्या जिल्हा स्पर्धेत गौरी सहभागी झाली, त्यावेळी तिने सर्वप्रथम सुवर्णपदक मिळवले. त्यानंतर अमरावती येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतही सुवर्णपदक मिळवले. त्यानंतर छत्तीसगड येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत ही तिने सुवर्णपदक मिळवले. गौरी लहान गटातून महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून देणारी पहिली खेळाडू ठरली. त्याचबरोबर नुकत्याच खेड येथे झालेल्या खुल्या तायक्वाँदो स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळवले.
गौरीचे वडील महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशनच्या पतपेढीत कामाला असून, आई गृहिणी आहे. गौरीला मोठा भाऊ असून, तो इयत्ता आठवीत शिकत आहे. गौरीच्या घरात खेळात यश मिळवलेले कोणीही नाही. वास्तविक गौरी व तिच्या भावाने एकत्रच प्रवेश घेतला. २०१५च्या फेब्रुवारीत त्यांनी प्रशिक्षण सुरू केले. मात्र, गौरीने तायक्वाँदोमध्ये खूपच प्रगती केली आहे. भविष्यात शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त करण्याबरोबर खेळात करियर करण्याचा तिचा मानस आहे.
गौरी वयाच्या सातव्या वर्षी खेळू लागली, तेव्हापासून ती स्पर्धेला जाऊ लागली. आई-बाबा अथवा घरातील कोणीही सोबत न जाता सर्व टीम व प्रशिक्षकांबरोबर गौरी खेळाच्या स्पर्धेला जाते. आई-बाबा केवळ रेल्वेस्टेशनपर्यंतच सोडायला जातात. विशेषत: तिला खेळाची आवड असल्यामुळे टीममधील दादा-तार्इंबरोबर ती जमवून घेते, किंबहुना छानपैकी एन्जॉयही करते.
लहानपणीची आवड
गौरीचा लहानपणापासूनच तायक्वाँदोकडे ओढा होता. आई-वडिलांचाही त्यांना पाठिंबा मिळाल्याने गौरीने राष्ट्रीय पातळीपर्यंत मजल मारली आहे.
गौरीने मिळविलेले यश
जाकादेवी येथे झालेल्या जिल्हा स्पर्धेत सुवर्णपदक.
अमरावती येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतही सुवर्णपदक.
छत्तीसगड येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक.
खेड येथे झालेल्या खुल्या तायक्वाँदो स्पर्धेत सुवर्णपदक.