कोकणच्या विकासाला मुख्यमंत्र्यांनी घातला खो, प्रमोद जठार यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 03:11 PM2019-12-07T15:11:49+5:302019-12-07T15:13:33+5:30
ज्या कोकणाने शिवसेनेला सर्वाधिक आमदार दिले. त्याच कोकणातील विकास प्रकल्पांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती देऊन खो घातला आहे. शेखचिल्लीप्रमाणे ठाकरेंचे कामकाज दिसतेय. शिवसेनेच्या झाडाला ज्या कोकणने वाढवले. त्याच झाडाच्या फांद्या तोडायला ठाकरे निघाले असल्याची टीका भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथे केली.
कणकवली : ज्या कोकणाने शिवसेनेला सर्वाधिक आमदार दिले. त्याच कोकणातील विकास प्रकल्पांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती देऊन खो घातला आहे. शेखचिल्लीप्रमाणे ठाकरेंचे कामकाज दिसतेय. शिवसेनेच्या झाडाला ज्या कोकणने वाढवले. त्याच झाडाच्या फांद्या तोडायला ठाकरे निघाले असल्याची टीका भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथे केली.
कणकवली येथील भाजप कार्यालयात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा चिटणीस रवींद्र शेट्ये उपस्थित होते . प्रमोद जठार म्हणाले, शिवसेनेला रत्नागिरीतून चार, सिंधुदुर्गातून दोन तसेच ठाणे, रायगड आणि मुंबईतून सर्वाधिक आमदार मिळाले. याच आमदारांच्या पाठबळावर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होता आले आहे. मात्र, कोकणातील विकास प्रकल्पांना टाळे लावण्याची कामगिरी त्यांनी बजावली आहे.
प्रकल्प बंद करणे खूप सोपे असते. पण प्रकल्पांना मान्यता मिळविण्यासाठी प्रचंड कालावधी लागत असतो. त्यामुळे विकास प्रकल्प बंद करण्याआधी त्यांची समीक्षा करा . पण कोकण विकासाच्या आड येऊ नका. कोकणातील विकास प्रकल्पांवरील स्थगिती मुख्यमंत्र्यांनी न उठवल्यास प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन भाजपतर्फे आंदोलन छेडणार असल्याचेही जठार यांनी यावेळी सांगितले.
भाजपच्या सिंधुदुर्ग कोअर कमिटीची बैठक शनिवारी कणकवली येथे होणार आहे. यात आठही तालुकाध्यक्षांची निवड होणार आहे. खासदार नारायण राणे, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नीतेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड प्रक्रिया होईल. तसेच सावंतवाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचेही नावही त्याचवेळी निश्चित होईल, असे जठार यांनी यावेळी सांगितले.
शिवसेना पक्षच ठेवलाय गहाण
आमदार नीतेश राणे हे कोकरू असल्याची टीका माजी पालकमंत्री दीपक केसरकर करत आहेत. पण काही वेळ त्यांनी नीतेश राणेंच्या बाजूला उभे राहून पहावे म्हणजे कोण कोकरू आणि कोण वाघ आहे ते समजून येईल . तसेच माझ्यावर पक्ष गहाण ठेवल्याची टीका करणाऱ्या केसरकरांनी काही वर्षापूर्वीच आमदारकीसाठी आपली निष्ठा आणि स्वाभिमान राणेंकडे गहाण ठेवला होता . आता तर त्यांच्या पक्षप्रमुखांनीच शिवसेना पक्ष पवार - गांधींच्या चरणी अर्पण केलाय. त्यामुळे केसरकरांनी आमच्यावर नाहक आरोप करू नयेत. तसेच राणे हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांचा सन्मान आम्ही कायमच ठेवणार आहोत, असेही प्रमोद जठार यावेळी म्हणाले.