मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या कुडाळमध्ये, शासन आपल्या दारीसाठी प्रशासन सज्ज
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: June 5, 2023 07:05 PM2023-06-05T19:05:52+5:302023-06-05T19:06:09+5:30
वाहन तळाची अशी राहणार व्यवस्था
सिंधुदुर्ग : ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाची पूर्वतयारी पूर्ण झाली असून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशासन पूर्ण तयारीनिशी सज्ज आहे. लाभार्थ्यांनीही प्रशासनाला सहकार्य करुन कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडावा आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासन आपल्या दारी या जिल्हास्तरीय कार्यक्रमाचा शुभारंभ मंगळवारी सकाळी ११ वाजता कुडाळ हायस्कूलच्या पटांगणावर होत आहे.
या कार्यक्रमासाठी केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे, बांधकाम तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह खासदार, आमदार, कोकण आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर आदी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील विविध गावातून लाभार्थ्यांना आणण्यासाठी एस.टी. बसेसची सुविधा करण्यात आली आहे. या बसेसमध्ये लाभार्थ्यांसाठी पाणी, नाश्ता, प्रथोमोपचार सुविधा करण्यात आली आहे. यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. कार्यक्रमस्थळी देखील पाणी, ओआरएस आणि जेवणाची सोय जागेवरच करण्यात आली आहे. त्याचबरोबरच लाभार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येणार असून त्यासाठी आरोग्य शिबीराची सोय करण्यात आली आहे.
वाहन तळाची अशी राहणार व्यवस्था
उद्या कुडाळ येथे होणाऱ्या शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी लाभार्थ्यांना घेवून येणाऱ्या मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यातील एस.टी. वाहनांसाठी कुडाळ येथील क्रीडा संकुल मैदानात वाहनतळ व्यवस्था करण्यात आली आहे. देवगड, कणकवली, वैभववाडी,कुडाळ तालुक्यातून येणाऱ्या एस.टी. वाहनांसाठी एस.टी.डेपो येथे तसेच खासगी वाहनांसाठी क्रीडा संकुल शेजारील हॉली बॉल मैदान आणि गवळदेव शेजारील खासगी मैदानात वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून येणाऱ्या एस.टी. तसेच खासगी वाहने यांनी याच ठिकाणी आपली वाहने लावून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.
३३५ जणांना रोजगाराची संधी
कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या माध्यमातून ३३५ जणांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. उद्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी मछिंद्र सुकटे यांनी कार्यक्रम स्थळी व वाहतळाच्या ठिकाणी भेट देवून पूर्वतयारीची पाहणी केली.
मुख्यमंत्र्यांचा दौरा पुढीलप्रमाणे
उद्या, मंगळवारी सकाळी 9.45 मोपा, विमानतळ गोवा येथे आगमन व मोटारीने जयप्रकाश चौक, सावंतवाडी जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी 10.15 वाजता सावंतवाडी मतदारसंघातील विविध प्रकल्पांच्या भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ:- जयप्रकाश चौक, सावंतवाडी. सकाळी 11.30 वाजता सावंतवाडी येथून मोटारीने कुडाळकडे प्रयाण. दुपारी 12 वाजता ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ :- कुडाळ हायस्कुल कुडाळ. दुपारी 2 वाजता कुडाळ हायस्कुल येथून मोटारीने वेंगुर्लाकडे प्रयाण. दुपारी 2.30 वाजता मंत्री उदय सामंत, यांच्या निवासस्थानी, वेंगुर्ला येथे आगमन व राखीव. दुपारी 3.15 वाजता वेंगुर्ला येथून मोटारीने चिपी विमानतळाकडे प्रयाण. सायं. 4 वाजता चिपी विमानतळ सिंधुदुर्ग येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.