मुख्यमंत्री येत्या शुक्रवारी रत्नागिरी दौऱ्यावर; सिंधुदुर्गातील अनेकांचा पक्ष प्रवेश, सुधीर सावंतांनी दिली माहिती
By सुधीर राणे | Published: December 12, 2022 06:52 PM2022-12-12T18:52:18+5:302022-12-12T19:09:49+5:30
'शाई फेकणे ही लोकशाही नव्हे'
कणकवली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १६ डिसेंबरला रत्नागिरीत येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्गातील अनेकांचे पक्षप्रवेशही घडतील व अन्य पक्षांच्या तुलनेत आमचा पक्ष जिल्ह्यात तुल्यबळ होईल. सिंधुदुर्गसह कोकणातील प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा करण्यात येणार आहे. यात समृद्धी आणि आनंदी गाव योजना, शेतीसमस्या या मुद्यांचा समावेश असल्याची माहिती बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते, माजी खासदार सुधीर सावंत यांनी दिली. दरम्यान, यावेळी तरंदळे येथील कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला.
कणकवली येथील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय आग्रे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, विधानसभा मतदार संघ प्रमुख संदेश सावंत- पटेल, उपजिल्हा प्रमुख महिंद्र सावंत, तालुकाप्रमुख भूषण परुळेकर आदी उपस्थित होते.
सुधीर सावंत म्हणाले, सिंधुदुर्गात ग्रामपंचायत निवडणुकीला आम्ही चांगल्या पद्धतीने सामोरे जात आहोत. या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यात पक्ष उभा करण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत. पक्षाच्या व वेगवेगळ्या पॅनेलच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीत उतरलो असून गावागावात पक्ष पोहोचविणे हाच महत्वाचा मुद्दा आहे. निवडणुकीनंतरही जिल्ह्यात पक्ष मजबुतीवर भर देण्यात येणार आहे. निवडणुकीत केवळ आश्वासनांची खैरात केली जाते. पण, आम्ही 'समृद्ध आणि आनंदी गाव' हे उद्दिष्ट ठेवून सामोरे जात आहोत. त्या अनुषंगाने आरोग्य, रोजगार हे प्रश्न आम्ही सोडविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शाई फेकणे ही लोकशाही नव्हे
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणा बाबत विचारले असता सावंत म्हणाले, या प्रकरणाचा आम्ही निषेध करतो. अशा प्रकारांतून काहीही साध्य होणार नाही. ही निव्वळ स्टंटबाजी आहे. शाई फेकणे ही लोकशाही नव्हे. घटनेचा तपास पोलिस करत आहेत. पोलिसांनी संबंधितांवर ३०७ चा गुन्हा दाखल केला ते योग्यच असेल. कारण त्यांना त्या घटनेची अधिकची माहिती आहे.