मुख्यमंत्री शनिवारी नाणीज दौऱ्यावर
By Admin | Published: October 14, 2016 12:37 AM2016-10-14T00:37:31+5:302016-10-14T00:37:31+5:30
विविध कार्यक्रम : सरसंघचालक भागवत यांच्या हस्ते १६ रोजी कार्यक्रम
रत्नागिरी : जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानतर्फे आयोजित ७३ हजार ३५२ रक्ताच्या बाटल्यांचा संकल्पपूर्ती सोहळा तसेच मरणोत्तर देहदानाचा संकल्प करणाऱ्या ५६ हजार ५३७ दात्यांचा सत्कार असे दोन कार्यक्रम शनिवार व रविवारी होणार आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत नाणीज येणार आहेत.
जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचा यंदा ५० वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने संस्थानतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. नरेंद्राचार्यजी यांच्या संकल्पनेतून रक्ताचे संकलन आणि देहदानाचा संकल्प असे दोन महत्वपूर्ण उपक्रम आयोजित करण्यात आले होते.
आतापर्यंत ५६ हजार ५३७ दात्यांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला आहे. या दात्यांचा सत्कार १५ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते होणार आहे. यावेळी केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री रवींद्र वायकर, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, कृषीमंत्री सदाभाऊ खोत व खासदार विनायक राऊत उपस्थित राहणार आहेत.
याचबरोबर रविवारी १६ आॅक्टोबर रोजी ७३ हजार ३५२ रक्तबाटल्यांचा संकल्पपूर्ती सोहळा सकाळी ११ वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याहस्ते होणार आहे. यावेळी अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत, पर्यावरण मंत्री रामदास कदम, खासदार चंद्रकांत खैरे, खासदार नानाभाऊ पटोले उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)
लष्करासाठी रक्तदान
सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी संस्थानतर्फे ७ हजार ८७० रक्ताच्या बाटल्या सुपुर्द करण्यात येणार आहेत, तर उर्वरित ६५ हजार ४८२ राज्य शासनाकडे देण्यात येणार आहेत. या महारक्तदान संकल्पपूर्ती सोहळ्यासाठी गेले दोन महिने राज्यभरात विविध ठिकाणी संस्थानतर्फे रक्तदान शिबिरे सुरु होती.
गडकरी, पर्रीकरही येणार
रविवारी होणाऱ्या महारक्तदान संकल्पपूर्ती सोहळ्यासाठी मोहन भागवत यांच्यासोबत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी व संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर हेही उपस्थित राहणार आहेत.