मुख्यमंत्र्यांच्या घोषणेने जिल्ह्यात पर्यटनाला मिळणार उभारी...!

By admin | Published: April 12, 2016 11:45 PM2016-04-12T23:45:24+5:302016-04-13T00:11:02+5:30

--रत्नागिरी पर्यटन विकास

Chief Minister's announcement will boost tourism in the district ...! | मुख्यमंत्र्यांच्या घोषणेने जिल्ह्यात पर्यटनाला मिळणार उभारी...!

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेने जिल्ह्यात पर्यटनाला मिळणार उभारी...!

Next




प्रकाश वराडकर ल्ल रत्नागिरी
कोकणसाठी स्वतंत्र पर्यटन विकास महामंडळ स्थापन करण्यासह रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांच्या पर्यटन विकासावर ३ हजार ५५ कोटी रुपये खर्च करण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत केली. त्यामुळे कोकणात बहरणाऱ्या पर्यटन व्यवसायाला आणखी उभारी मिळणार आहे.
कोकणची अर्थव्यवस्थाच पर्यटनातून उभी राहणार असून, पर्यटनात प्रतिगोवा, प्रतिकेरळ असे स्वरूप प्राप्त होण्याची आशा पल्लवित झाली आहे.
दोन दशकांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री असताना सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा, तर रत्नागिरी फलोद्यान जिल्हा म्हणून घोषित करून येथील पर्यटन विकासाला चालना देण्याचे पहिले पाऊल उचलले होेते. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही वर्षात पर्यटन विकास मोठ्या प्रमाणावर झाला आहे. गोव्याकडील पर्यटक मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळांकडे वळला आहे. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातही पर्यटन व्यवसायाची मोठी क्षमता असताना रत्नागिरीला पर्यटन जिल्ह्याचा दर्जा मिळाला नव्हता.
मुंबई व कोकणाविषयीच्या सोमवारी विधानसभेत झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोकणसाठी स्वतंत्र पर्यटन विकास महामंडळ, रत्नागिरी व सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासाकरिता एशियन डेव्हलपमेंट बॅँकेचे सहकार्य घेतले जाणार असून, ३ हजार ५५ कोटींचा आराखडा या बॅँकेकडे लवकरच सादर केला जाणार आहे. कोकण पर्यटन विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. स्वतंत्र पर्यटन विकास मंडळासाठी स्वतंत्र सनदी अधिकारी नियुक्त करण्याची आमदार भास्कर जाधव यांची मागणीही त्यांनी मान्य केली.


कोकण पर्यटन महामंडळाची घोषणा चांगली आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या अन्य घोषणाही चांगल्या आहेत. त्यामुळे या घोषणांचे स्वागत आहे. कोकणला निसर्गदत्त सौंदर्याची देणगी लाभली आहे. लोभस सागरी किनाऱ्याचे वरदान आहे. त्यामुळे रत्नागिरी व सिंधुदुर्गसह कोकणच्या पर्यटनाचा विकास करणाऱ्या या घोषणा नक्कीच चांगल्या आहेत. शासन याबाबत स्वत: बोलते आहे. परंतु आर्थिक बाबतीत गेल्या काही दिवसात सरकारचे प्रतिनिधी ज्याप्रकारे भाष्य करीत आहेत ते पाहता पर्यटन विकासाबाबत केलेल्या या घोषणाच चांगल्या आहेत, असे म्हणण्याची वेळ हे सरकार कोकणवासीयांवर येऊ देणार नाही, अशी आशा करायला हरकत नाही. प्रश्न असा आहे की, या पर्यटन विकासासाठी अर्थसंकल्पीय तरतूद असते. कागदावर व प्रत्यक्षात त्यामध्ये तफावत नको. हॉटेल्सनाही उद्योगाचा दर्जा हवा.
- रमेश कीर, कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष, कोकण म्हाडाचे माजी अध्यक्ष


फडणवीस सरकारने कोकण पर्यटन विकासाबाबत जे निर्णय घेतले आहेत ते अत्यंत सकारात्मक असून, कोकणचा कायापालट होईल. त्यातून रोजगार निर्मिती होणार आहे. ग्रीन रिफायनरीही प्रदूषणमुक्त असेल. स्वतंत्र पर्यटन महामंडळ उपक्रम वेगाने राबवेल व भाजप सरकार कोकणला वरदान ठरेल.
- सचिन वहाळकर,
भाजप माजी जिल्हाध्यक्ष, रत्नागिरी.
रत्नागिरीतील तटरक्षक दलाच्या विमानतळाचा विस्तार केला जाणार असून, विमानतळ व्यावसायिक तत्त्वावर चालवला जाणार आहे. तेथे रात्रीही प्रवासी विमाने उतरू शकतील, अशी व्यवस्था केली जाणार आहे. स्वदेश दर्शनांतर्गत योजनेतून विजयदुर्गसह ९ ठिकाणी पर्यटक निवास उभारले जाणार आहेत. चिपी विमानतळ विकसित होणार आहे. मालवण तालुक्यातील सी वर्ल्ड हा प्रकल्प ३५० एकरात उभारला जाणार आहे.
कोकण पर्यटन विकासासाठी ज्या काही घोषणा केल्या आहेत, त्यांची अंमलबजावणी योग्यरित्या व निर्धारित कालावधीत झाल्यास पर्यटन विकासात पिछाडीवर असलेल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या पर्यटन व्यवसायाला उभारी मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

Web Title: Chief Minister's announcement will boost tourism in the district ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.