मुख्यमंत्र्यांची रत्नागिरीतील सभा इतरत्र ‘लाईव्ह’
By admin | Published: November 17, 2016 10:06 PM2016-11-17T22:06:49+5:302016-11-17T22:06:49+5:30
पहिला दौरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा होत आहे.
रत्नागिरी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २0 रोजी रत्नागिरीत तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे २१ रोजी चिपळूणमध्ये प्रचारासाठी येत आहेत. मुख्यमंत्र्यांची रत्नागिरीत होणारी सभा दापोली, चिपळूण, खेड आणि राजापूर या चार शहरांमध्ये ‘लाईव्ह’ दाखवली जाणार आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी दिली.
आतापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात नगर परिषद निवडणुकांचा प्रचार वैयक्तिक संपर्कावरच सुरू आहे. आता मतदानाला शेवटचा आठवडा शिल्लक राहिल्याने येत्या आठवड्यात अनेक नेत्यांचे दौरे जिल्ह्यात होणार आहेत. त्यात पहिला दौरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा होत आहे.
रविवार २0 रोजी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री फडणवीस यांची रत्नागिरीतील कै. प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे जाहीर सभा होणार आहे. ही सभा जिल्ह्यातील पाचही नगर परिषदांसाठी होत असून, ती उर्वरित चार ठिकाणी म्हणजेच दापोली, खेड, चिपळूण आणि राजापूरमध्ये थेट दाखवली जाणार आहे. त्यासाठी हायटेक यंत्रणा उभारण्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे, असेही माने यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांपाठोपाठ सोमवारी २१ रोजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे प्रचार सभेसाठी चिपळूणला येणार आहेत. भाजप या निवडणुकीत स्वबळावर रिंगणात उतरला आहे. त्यामुळे अधिकाधिक कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असल्याने स्थानिक पातळीवर प्रतिसादही चांगला मिळत आहे. आता दोन महत्त्वाच्या व्यक्तींचे दौरे होत असल्याने कार्यकर्त्यांमधील उत्साह दुणावला असल्याचे त्यांनी सांगितले.
रत्नागिरीतील सभेची जोरदार तयारी सुरू झाली आहे. या सभेला फडणवीस यांच्यासोबत शिक्षण मंत्री विनोद तावडे हेही उपस्थित राहणार आहेत. या प्रचार सभेमुळे रत्नागिरीतील वातावरण भापजला अधिक पूरक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)