मुख्यमंत्र्यांची सभा म्हणजे ‘फ्लॉप शो’
By admin | Published: February 15, 2017 11:07 PM2017-02-15T23:07:54+5:302017-02-15T23:07:54+5:30
नीतेश राणे यांची टीका : केवळ अडीच हजारांची उपस्थिती अपमानास्पद बाब
कुडाळ : मुख्यमंत्र्यांच्या सभेला सिंधुदुर्गातील भाजपमार्फत केवळ अडीच हजारांची उपस्थिती म्हणजे पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा केलेला अपमान आहे. ही सभा म्हणजे भाजपचा फ्लॉपशो असल्याची टीका काँग्रेसचे आमदार नीतेश राणे यांनी केली. तसेच जाहीर सभा कशी घ्यायची असते, हे शिकण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कुडाळ येथे १७ फेबु्रवारी रोजीच्या काँग्रेस प्रचार सभेला यावे, आम्ही जागा ठेवू, असा सणसणीत टोलाही त्यांनी भाजपला लगावला.
कुडाळ येथे काँग्रेसचे आमदार नीतेश राणे व जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांच्या सभेतील उपस्थिती आणि काँग्रेसच्या सभेची माहिती दिली. यावेळी कुडाळ तालुकाध्यक्ष सतीश साळगावकर, उपतालुकाध्यक्ष सुनील भोगटे, नगराध्यक्ष विनायक राणे, उपनगराध्यक्ष अनंत धडाम, नगरसेवक सुनील बांदेकर, नगरसेविका संध्या तेरसे, साक्षी सावंत, सुप्रिया मांजरेकर, सरोज जाधव, राकेश कांदे व काँग्रेसचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी नीतेश राणे म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री राज्यातील भाजपचे प्रमुख चेहरा आहेत. अशावेळी त्यांच्या जाहीर सभेला केवळ अडीच हजारच माणसे उपस्थित राहिली, हे चित्र जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची वास्तव अवस्था दर्शविणारे आहे. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांसह भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी आत्मचिंतन करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
यावेळी दत्ता सामंत म्हणाले, १७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता काँग्रेसची जाहीर सभा होणार आहे. या सभेत माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते नारायण राणे, माजी खासदार नीलेश राणे, आमदार नीतेश राणे हे मार्गदर्शन करणार असून, जिल्ह्यातील पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. दोन वर्षांपूर्वी मालवण येथे केलेलेच भाषण भाजपच्या सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा केले. शिवाय त्यांनी जिल्ह्यातील कोणत्याच प्रश्नाबाबत भाषणातून मत व्यक्त केले नाही, त्यामुळे जिल्हा विकासाचे व्हिजन कसे असेल, याची प्रचितीही दिली.
माजी मुख्यमंत्री नारायण राणेंवर खोटेनाटे आरोप करून खासदार, आमदार, पालकमंत्री झालेल्यांनी कोणताच विकास केला नाही. खासदारांनी तर ‘खंबाटा’ प्रकरणात ४०० कोटी रूपयांचा भ्रष्टाचार करून कामगारांना देशोधडीला लावले. आता या निवडणुकीत जनता केलेली चूक सुधारणार असून काँग्रेसच्या पाठिशी भक्कम उभी राहणार आहे, असे सांगत या सभेत काँग्रेसचा जाहीरनामाही प्रसिध्द करण्यात येणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.
भाजपच्या सभेची वेळ होऊन देखील सभेला कोणीच नसल्यामुळे चक्क मुख्यमंत्र्यांना पाऊण तास थांबावे लागले. जे पदाधिकारी सभेला माणसे आणू शकत नाहीत, ते मतदानासाठी कसे आकर्षित करणार? याचाही विचार भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी करावा, असेही नीतेश राणे यांनी यावेळी
सुचविले. (प्रतिनिधी)