बालकाचा विहिरीत पडून मृत्यू
By admin | Published: December 23, 2016 11:01 PM2016-12-23T23:01:35+5:302016-12-23T23:01:35+5:30
नाटळ-खांदारवाडीतील घटना : कुटुंबीय धार्मिक विधीसाठी आले होते गावी
कनेडी : कणकवली तालुक्यातील नाटळ-खांदारवाडी येथील मुंबईस्थित रूद्र आकाश निकम या दीड वर्षीय बालकाचा घराशेजारील विहिरीमध्ये पडून मृत्यू झाला. वर्षश्राद्धासाठी आकाश निकम कुटुंबीय मंगळवारी गावी आले होते. ही घटना शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता घडली.
आकाश निकम हे मुंबई-शिवडी येथे राहतात. ते धार्मिक कार्यक्रमानिमित्त आपल्या नाटळ येथील मूळ गावी आले होते. आकाश निकम हे २२ डिसेंबरला मुंबईला परत गेले. तर त्यांची पत्नी अवनी ही नाटळ येथेच थांबली होती. रूद्र हा आई व आजीबरोबर वर्षश्राद्ध झाल्यावर रविवारी नातेवाइकांचे लग्न आटोपून नंतर मुंबईला जाणार होते.
शुक्रवारी सकाळी रूद्र इतर मुलांसोबत अंगणात खेळत होता. मुले शाळेत गेल्यानंतर रूद्र एकटाच बाहेर खेळत होता. काही वेळाने आई बाहेर आली. तिला रूद्र कुठे दिसत नसल्याने तिने त्याचा शोधाशोध सुरू केली. नजीकच असलेल्या विहिरीत शोधण्यात आले तेव्हा त्यांना रूद्र विहिरीत आढळून आला. त्याला तत्काळ बाहेर काढण्यात आले. कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये हलविण्यात आले. परंतु, त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वडील व आजोबा मुंबईत असल्याने रूद्रवर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (वार्ताहर)