हरवलेल्या ‘रिंकू’ला ‘चाईल्ड हेल्पलाईन’चा आधार
By admin | Published: June 27, 2016 10:46 PM2016-06-27T22:46:15+5:302016-06-28T00:34:14+5:30
मालवणात गेले पंधरा दिवस वास्तव्य : सिंधुदुर्ग बाल निरीक्षणगृहात रवानगी
मालवण : मालवण एसटी बसस्थानक येथे कुटुंबाच्या शोधार्थ हरवलेल्या एका परप्रांतीय १७ वर्षीय मुलाला रविवारी ‘चाईल्ड लाईन’ने मदतीचा हात देण्यात आला आहे. गेले १५ दिवस हा मुलगा मालवण एसटी आवारात भटकत होता. त्याला व्यवस्थित स्पष्ट बोलता येत नसल्याने अखेर त्याची ओरोस येथील सिंधुदुर्ग बाल निरीक्षणगृहात रवानगी करण्यात आली आहे. मालवण आगारात एकटाच असल्याने त्याला दोन तीन वेळा जेवणासाठी मार खावा लागला होता. त्यामुळे त्याची ‘चाईल्ड हेल्पलाईन’ने दखल घेत सुरक्षित स्थळी हलविल्याबद्दल एसटी अधिकारी, चालक-वाहक तसेच प्रवासीवर्गाने आभार मानत कौतुक केले आहे. गेले १५ दिवस मालवण बसस्थानकात १७ वर्षीय अल्पवयीन परप्रांतीय मुलगा बेवारस स्थितीत होता. त्याला एसटी कर्मचारी रात्रीच्या वेळी जेवायची व्यवस्थाही करायचे मात्र त्याला बोलता येत नसल्याने त्याच्याकडून कोणतीही माहिती उपलब्ध होत नव्हती. या मुलाने १५ दिवसांत कोणाही प्रवाशाला उपद्रव होईल, असे कृत्य केले नाही. याबाबत चाईल्ड लाईन टीम मेंबर अश्विनी चव्हाण यांनी शनिवारी रात्री पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक डॉ. सागर वाघ व त्यांचे पथक बसस्थानक येथे पोहचले. मुलगा भुकेला असल्याने त्याची जेवणाची व्यवस्था करून त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्याच्याकडून अपेक्षित माहिती प्राप्त होऊ शकली नाही. ‘चाईल्ड हेल्पलाईन’चा आधार पूनम चव्हाण यांनी रविवारी सकाळी ‘चाईल्ड हेल्पलाईन’च्या १०९८ या टोलफ्री क्रमांकावर संपर्क करून याबाबत माहिती दिली. त्यांनतर लागलीच ओरोस येथून ‘चाईल्ड हेल्पलाईन’चे पथक मालवणात दाखल झाले. यावेळी पथकातील चाईल्ड लाईनचे जिल्हा व्यवस्थापक हेमंत धुरी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी उमेश मोरे, अश्विनी चव्हाण, मीनल टिकम यांनी त्या मुलाची चौकशी केली. मुलाची बोलीभाषा स्पष्ट समजत नसल्याने त्याला सिंधुदुर्ग बाल निरीक्षण गृहात दुभाषिकामार्फत त्याची चौकशी करून त्याच्या कुटुंबीयांचा शोध घेतला जाणार आहे, असे धुरी यांनी सांगितले. रिंकू नाव असण्याची शक्यता बेवारस मुलाला बोलता येत नसल्याने तो नेमका कुठला हे समजणे कठीण आहे. मात्र, त्याच्या उजव्या हातावर ‘रिंकू-कनकपूर’ असे लिहिलेले होते. त्याच्या अंगात टी शर्ट, हाफ पँट होती. गेले १५ दिवस तो मालवण बसस्थानक परिसरात भटकत होता. एकदा दुपारच्या वेळी जेवण मागण्यासाठी गेलेल्या रिंकूला संबंधित हॉटेल मालकाने मारलेही होते. यावेळी एका वाहकाने त्याची बाजू घेत त्याला आधार दिला होता. मालवण ‘चाईल्ड लाईन’च्या टीमच्यावतीने मदतीचा हात त्याला देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)