बाल साहित्य संमेलन-
By admin | Published: December 15, 2014 07:51 PM2014-12-15T19:51:42+5:302014-12-16T00:19:07+5:30
फेरफटका--वृंदा कांबळी
आज वर्तमानपत्रात दापोलीत झालेल्या बालसाहित्य संमेलनाची बातमी वाचनात आली. मी शाळेत सेवेत असताना काव्य वाचनासारखे कार्यक्रम शाळा पातळीवर आयोजित करीत असे. त्याची आठवण झाली. साहित्याविषयी अभिरू ची निर्माण करण्यासाठी मुलांपासूनच सुरुवात करायला हवी, परंतु शाळेतील एकूण दिनक्रम, तेथील यंत्रणा या सर्वांत व्यापक पातळीवर ते करता येणे कधी कधी अडचणीचे होते. त्यासाठी अशाप्रकारे सामाजिक संस्थांचाही सहभाग त्यात असणे गरजेचे आहे. मुलांबरोबर पालकही उपस्थित राहतात. त्यामुळे त्या कार्यक्रमाला भव्य स्वरूप होते. मुलांना व्यासपीठ मिळाल्यामुळे त्यांना प्रेरणा मिळते. ती मुलं आवडीने काही वाचू लागतात. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी करावयाच्या अनेक प्रयत्नांपैकी बाल साहित्य संमेलने भरवणे हाही एक प्रभावी प्रयत्न आहे. मागील वर्षी बांदा शिक्षण प्रसारक मंडळात असलेल्या बालसाहित्य संमेलनाच्या प्रथेविषयी मी लिहिले होतेच. शाळेच्या संस्थाचालकांनी अशा प्रकारच्या दृष्टिकोनातून विचार करणे हे खूप महत्त्वाचे आहे आणि आज ते गरजेचे आहे. अशा मनाला आश्वासक दिलासा व आनंद देणाऱ्या घटना घडत आहेत. अनेक ठिकाणी संवेदनशीलतेने प्राप्त परिस्थितीचा विचार केला जातोय.
जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा देवसू शाळेतील शिक्षक मनोहर परब यांनी केलेला काव्यसंग्रह प्रकाशित करण्याचा उपक्रम असाच अत्यंत स्तुत्य आहे. त्यांनी शाळेतील मुलांनी स्वत: केलेल्या कवितांचा ‘ऊब’ नावाचा काव्यसंग्रह प्रकाशित केला. त्या उपक्रमामध्ये मुख्याध्यापक, पालक, गटशिक्षणाधिकारी या सर्वांचे सहकार्य लाभले. सर्वांचे सहकार्य मिळविणे हे एक कौशल्य असते, पण उपक्रम कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक सहकार्य मिळविण्याचे कौशल्य कमी पडते आणि चांगले उपक्रमही दुर्लक्षित राहतात. पण श्री. मनोहर परब यांंनी आपली कल्पना साकार करण्यासाठी सर्वांचे अपेक्षित सहकार्य मिळविले. सर्वांच्या सहकार्याच्या समन्वयातून साकारला सुरेख असा ‘ऊब’ हा काव्यसंग्रह. पुस्तकाचे मुखपृष्ठही आकर्षक आणि सूचक आहे. काटक्यांनी बांधलेल्या घरामध्ये अंड्यातून बाहेर पडलेली, पंख न फुटलेली पिल्ली आहेत. त्यांना पक्षीण आपल्या पंखांची ऊब देत आहे. तशीच लहान मुलांना अशा उपक्रमातून ममतेची, संस्काराची ऊब द्यावयाची आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये या दृष्टीने विचार करणारी माणसे हवी आहेत. नाहीतर काही मोजके शिक्षक या दृष्टीने विचार करीत असताना एकटे पडतात किंवा भोवतालच्या लोकांच्या विरोधात गराड्यात त्यांचा एकाकी विचार अभिमन्यू होतो. तसं व्हायला नको असेल, तर अशा उपक्रमशील शिक्षकांना समाजातील अन्य घटकांनीही प्रोत्साहन देण्याची गरज आहे. देवसू गावातील ग्रामस्थांनी या दृष्टीने चांगला आदर्श ठेवला आहे. धडपडणाऱ्या शिक्षकांच्या मनातील उर्मी, प्रोत्साहनाअभावी वाळूतील पाण्याच्या धारेप्रमाणे विरून जाता नये. ती जिवंत ठेवली पाहिजे. श्री. मनोहर परब यांच्यासारखे उपक्रमशील शिक्षक असतील त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली पाहिजे आणि त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य दिले पाहिजे.
लहान मुलांना साहित्यातून संस्कार, विचार देणे गरजेचे आहे. समाजाच्या विकासाला पोषक अशी विचारांची बैठक त्यांची आतापासूनच तयार झाली पाहिजे. त्यासाठी ‘साहित्य’ हे प्रभावी माध्यम आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांसाठी साहित्यिक उपक्रम राबविले गेले पाहिजेत. विविध उपक्रमांच्या माध्यमातून मुलांमध्ये साहित्यिक अभिरूची निर्माण केली पाहिजे. बालसाहित्य संमेलन,
मुलांचे काव्यसंग्रह अशा प्रकारच्या तुरळक घटना घडत असतात. त्या वाढल्या पाहिजेत. विद्यार्थ्यांवर संस्कार करणारे असे उपक्रम बळकट केले पाहिजेत. गावोगावी बालसाहित्य संमेलनांसारखे
कार्यक्रम राबवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य घडले पाहिजे. त्यासाठी शासन, अधिकारी वर्ग व समाज यांचे एकमेकांना सहकार्य हवे.
(लेखिका साहित्यिका आहेत.)