चक्क दारू पिऊन गुरूजी शाळेत, गटविकास अधिकाऱ्यांसमोर मुलांनी वाचली मास्तरची कुंडली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 12:50 AM2018-08-31T00:50:37+5:302018-08-31T00:52:35+5:30
कोनशीत चक्क माणिक सातपुते हे गुरूजीच दारू पिऊन शाळेत येतात. तसेच गुटखा खाऊन टाकलेली पाकिटे मुलांना उचलायला लावत असल्याने विद्यार्थी चांगलेच संतप्त झाले
सावंतवाडी : कोनशीत चक्क माणिक सातपुते हे गुरूजीच दारू पिऊन शाळेत येतात. तसेच गुटखा खाऊन टाकलेली पाकिटे मुलांना उचलायला लावत असल्याने विद्यार्थी चांगलेच संतप्त झाले आणि पंचायत समितीचे गटविकास अधिकरी गजानन भोसले यांना घेराव घातला. त्यांच्यासमोर शिक्षकाची कुंडली वाचली. अखेर गटविकास अधिकारी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत त्यांची बदली सावंतवाडी पंचायत समितीत करण्याची घोषणा केली आहे. तर पुन्हा सातपुते गुरूजी शाळेत आल्यास मुलांनाच शाळेत पाठवणार नसल्याचा इशारा पालकांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिला आहे.
कोनशी शाळेत पहिली ते सातवीचा वर्ग आहे. या शाळेत तीन शिक्षक असून माणिक सातपुते हे शाळेचे मुख्याध्यापक आहेत. पण ते शाळेत येऊन मुलांना शिकवण्याचे सोडून सतत गैरहजर राहतात. तसेच जेव्हा शाळेत असतात तेव्हा शाळेत मद्यपान करतात आणि हा मद्यपानाचा वास येऊ नये म्हणून जोरात फॅन लावणे तसेच मोबाईल पॉकेटमध्ये गुटखा घालून तो सतत शाळेत खाणे, त्यांची पाकिटे मुलांना उचलण्यास सांगणे, दारूच्या बाटल्या धान्याच्या पोत्यात ठेवणे हे प्रकार गेली दोन वर्षे सुरू आहेत. याबाबत पालकांनी शिक्षकांना समजही दिली आहे. पण त्यांनी याची कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालक गुरूवारी चांगलेच संतप्त होत थेट सावंतवाडी पंचायत समिती गाठली. यावेळी त्यांनी गटविकास अधिकारी गजानन भोसले यांनाच घेराव घालत शाळेत सुरू असलेला प्रकार त्यांच्या कानावर घातला. त्यांनीही विद्यार्थ्यांची कैफियत योग्य प्रकारे ऐकून घेतली. विद्यार्थी एक एक प्रकार सांगत होते ते ऐकून गटविकास अधिकारी आश्चर्यचकित होत होते. अखेर पालक व विद्यार्थी यांच्या समोर गटविकास अधिकारी यांनी सदर शिक्षक सातपुते यांना शुक्रवारपासून कोनशी शाळेत न पाठवता सावंतवाडी पंचायत समिती येथे आणून बसवण्यात येईल, असे जाहीर केले.
तसेच त्याचा अहवाल जिल्हा परिषद गटशिक्षण अधिकारी यांना पाठवण्यात येणार आहे, हे स्पष्ट केले. त्यावर मुलांनी गटविकास अधिकाºयांच्या घोषणेचे टाळ्या वाजवून स्वागत केले. तसेच यावेळी पालकांनी जर सातपुते पुन्हा कोनशी शाळेत आल्यास मुलांना शाळेत पाठवून देणार नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी कोनशी सरपंच सुभाष सावंत, महेश गवस, रवींद्र काळे, महेश कोनसकर, स्वप्नील सावंत, सुभाष गवस, सौरभ सिध्दये, समिक्षा सावंत, दिशा नाईक, स्मिता गवस, धनश्री कोनशीकर, उषा केसरकर, प्रियंका सावंत, संदीप कोनसकर, अविनाश गावडे आदी उपस्थित होते.
शिक्षकाची कोनशीतून बदली : गजानन भोसले
सदर शिक्षकाबाबत आमच्याकडे आलेल्या तक्रारी व मुलांनी दिलेली माहिती याला अनुसरून या शिक्षकाची कोनशीतून सावंतवाडी पंचायत समितीत बदली करण्यात येईल, अशी माहिती गटविकास अधिकारी गजानन भोसले यांनी दिली आहे. तसेच या शिक्षकाबाबतचा अहवालही वरिष्ठांना देण्यात येणार आहे, असे ही त्यांनी जाहीर केले. यावेळी गटशिक्षकण अधिकारी कल्पना बोडके उपस्थित होत्या