चिपी विमानतळाचे उदघाटन ५ मार्च रोजी, मुख्यमंत्री उपस्थित राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 10:25 AM2019-03-04T10:25:13+5:302019-03-04T10:26:37+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला योगदान ठरणाऱ्या चिपी विमानतळाचे उद्घाटन ५ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी केंद्र्रीय मंत्री सुरेश प्रभू उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती माजी आमदार तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला योगदान ठरणाऱ्या चिपी विमानतळाचे उद्घाटन ५ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी केंद्र्रीय मंत्री सुरेश प्रभू उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती माजी आमदार तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान, आगामी काळात होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात बुथ बनवण्याचे काम सुरू आहे. यावेळी तालुकाध्यक्ष महेश सारंग, महेश धुरी, बाळू शिरसाट, दत्ता कोळमेकर आदी उपस्थित होते.
यावेळी तेली म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्याला विकासाकडे नेणारे चिपी विमानतळ आता अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे आचारसंहितेपूर्वी या विमानतळाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यासाठी खुद्द मुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत.
५ मार्चला हा कार्यक्रम ठरला आहे. यावेळी केंद्र्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्यासह भाजपाचे व शिवसेनेचे पदाधिकारी, नेते उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर या विमानतळाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले होते. त्या ठिकाणी खासगी विमान उतरविण्यात आले होते. मात्र आता अधिकृतरित्या शासकीय उद्घाटन होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन केले.
चिपी विमानतळ जिल्ह्यातील लोकांसाठी मार्गदर्शक ठरणार असून, विकासाला चालना देणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात त्याचा फायदा निश्चितच येथील लोकांना होणार आहे. भाजपच्या माध्यमातून पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी बुथ निहाय कमिट्या घोषित करण्याचे काम सुरू आहे.
या बुथ प्रमुखांना पदे जाहीर करण्यात आली आहेत. गावागावात वस्तीवाड्यांवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न सुरू आहे, असे तेली म्हणाले.