मिरचीची धुमी घालून हत्तीला पळविले
By admin | Published: June 11, 2014 12:35 AM2014-06-11T00:35:12+5:302014-06-11T00:35:39+5:30
नानेली- सुतारवाडी येथील घटना
माणगाव : घराच्या पडवीत ठेवलेल्या रेशन दुकानावरील तांदळाच्या बारदानाचा वास आल्याने पडवीची खिडकी उचकटून घराभोवती सुमारे अर्धा तास धिंगाणा घालणाऱ्या हत्तीला अखेर घरमालकाने घराच्या मागच्या बाजूस मिरचीची धुमी घालून पळविले. मात्र, या अर्ध्या तासाच्या थरार नाट्यात सावंत कुटुंबियांनी प्रत्यक्ष यमराजच घराभोवती फेऱ्या मारीत असल्याचा अनुभव घेतला.
सोमवारी रात्री २.३० वाजण्याच्या सुमारास नानेली- सुतारवाडी येथील सुमन मुकुंद सावंत यांच्या घराकडे हत्तीचे आगमन झाले. समोरच्या बंदिस्त पडवीत घरगुती वापरासाठी रेशन दुकानवरील रिकामी तांदळाची चार बारदाने आणून ठेवली होती. त्यांचा वास आल्याने या टस्कराने पडवीची खिडकीच उचकटून काढली. कसला तरी आवाज आल्याचे सावंत यांच्या लक्षात येताच त्यांनी दार उघडून अंदाज घेतला असता, हत्ती पडवीच्या खिडकीतील बारदाने सोंडेने बाहेर घेत असल्याचे दिसले. त्यांनी लगेच घरातील इतरांना याची कल्पना दिली. परंतु हत्ती काही केल्या तेथून हालेना. अखेर प्रसंगावधान राखून सावंत यांनी काही दिवसांपूर्वीच एका मार्गदर्शन शिबिरादरम्यान हत्तींना पळवून लावण्याविषयी डॉ. रुद्र यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या घराच्या मागील बाजूस मिरचीची धुनी पेटविली. यामुळे हत्तीने लगेचच तेथून पळ काढला. परंतु हत्तीने इतर कसलेही नुकसान केले नाही. या अर्ध्या तासाच्या थरार नाट्यात सावंत कुटुंबियांनी साक्षात काळ अनुभवला.
सध्या माणगाव खोऱ्यात हत्तींचा वावर वाढल्याने ग्रामस्थांना वनविभागाकडून सतर्कतेचा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)