‘सेक्रेड हार्ट स्कूल’मध्ये चिमुकल्यांचे बॅण्डपथक
By admin | Published: January 9, 2016 12:02 AM2016-01-09T00:02:30+5:302016-01-09T00:33:43+5:30
अनोखा उपक्रम : चिमुकल्यांच्या बॅण्डवर सारेच थिरकले!
मेहरून नाकाडे -- रत्नागिरी पांढऱ्या रंगाच्या पोशाखावर घालण्यात आलेला आकर्षक लाल रंगाचा कोट, डोक्यावर पांढरी लाल तुरेवाली टोपी आणि शाळेच्या प्रांगणात गुंजणारे मधूर सूर, मोठ्यानाही लाजवेल, असे सुमधूर संचलन, त्याला मिळालेली कौतुकाची थाप हे सारे वातावरण अनुभवायला मिळाले ते रत्नागिरी शहरातील सेक्रेड हार्ट कॉन्व्हेट स्कूल, उद्यमनगरमध्ये! या चिमुकल्यांनी बॅण्ड पथकावर सादर केलेली देशभक्तीपर गीते, प्रार्थना साऱ्यांच्याच कौतुकास पात्र ठरली.
शालेय शिक्षणाबरोबर एक धाडसी पाऊल उचलून शाळेने तयार केलेल्या ‘स्कूल बँड’चे उद्घाटन जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी. यांच्या हस्ते करण्यात आले. बँड पथकाने जिल्हाधिकारी व मान्यवरांचे स्वागत केले. सलग ४५ मिनिटे विद्यार्थ्यांनी संचलन केले.
जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी. यांनी शाळेचा नवोपक्रम व संकल्पनेस कारणीभूत असलेले शाळेचे शिस्तबध्द व्यवस्थापन, शालेय नियमित कामकाज, सदैव तत्पर असलेला शाळेचा शिक्षकवर्ग व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. मुख्याध्यापिका सिस्टर आयरीन, व्यवस्थापिका सिस्टर डायनोसिया, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सिस्टर रेमेथिन व कर्मचारीवर्गाचे अभिनंदन करून नवीन संकल्पना व उपक्रम निर्मितीबद्दल शुभेच्छा
दिल्या.
कार्यक्रमाचे औचित्य साधून शिक्षक - पालक संघाचे सदस्य डॉ. संजय कुलकर्णी यांचा जगातील हुशार मंडळींमध्ये सहभाग झाल्याबद्दल तसेच राज्यस्तरीय शालेय गोळाफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेती साक्षी कनगुटकर, राज्यस्तरीय तायक्वाँदो स्पर्धेत सुवर्णपदक विजेती सिध्दी तांजे यांना शाळेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. (प्रतिनिधी)
शाळेचे बॅण्डपथक तयार करण्यासाठी मुख्याध्यापिका सिस्टर आयरीन गेली दोन वर्षे विचाराधीन होत्या. यावर्षी त्यांनी पालकांसमोर हा प्रस्ताव ठेवला. संमती मिळाल्यानंतर त्यांनी बॅण्डपथकाचे सर्व साहित्य काही खरेदी केले. त्यानंतर त्यांनी प्रशिक्षक मि. राजीव, मि. जॉन्सन्, मि. जोस यांना पाचारण केले.
शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी बॅण्डपथकाचे प्रशिक्षण सुरू होईल. गेला दीड महिना न चुकता सराव सुरू होता. विद्यार्थ्यांचाही त्यास भरभरून प्रतिसाद लाभला. विद्यार्थी-विद्यार्थिनींना बॅण्ड वाजवण्याबरोबर बॅण्डच्या तालावरील संचलन शिकविण्यात आले. हा अनोखा उपक्रम या शाळेत राबवण्यात आला आहे.
या बॅण्ड पथकामध्ये ५० विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाल्या आहेत. सततच्या सरावामुळे बॅण्डवर राष्ट्रगीत, वंदे मातरम, विविध प्रार्थना, इंग्रजी गाणी विद्यार्थी सुंदर सादर करतात. सलग ४५ मिनिटे विद्यार्थी बॅण्डच्या तालावर सुंदर संचलन सादर करीत आहेत. प्रशिक्षकांनी केलेल्या मेहनतीने हे बॅण्डपथक तयार झाले आहे.