चिपी विमानतळाची मोजणी रोखली
By admin | Published: December 15, 2014 10:09 PM2014-12-15T22:09:16+5:302014-12-16T00:13:42+5:30
प्रक्रिया चुकीची : प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा आरोप
कुडाळ : परूळे चिपी येथील विमानतळासाठी संपादित करण्यात आलेल्या जागेची मोजणी करण्यासाठी आलेल्या एमआयडीसी रत्नागिरीच्या व वेंगुर्ले भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी रोखले. यामुळे जागेची मोजणी होऊ शकली नाही. प्रकल्पग्रस्तांनी मात्र ही मोजणीची प्रक्रिया चुकीची असल्याचे सांगितले.
विमानतळासाठी संपादित करण्यात आलेल्या जागेची मोजणी डिसेंबर २०१४ मध्ये करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने एमआयडीसी रत्नागिरी व वेंगुर्ले भूमी अभिलेखच्या उपअधीक्षकांनादिले होते. या आदेशानुसार संबंधित विभागांकडून मोजणीचे काम सुरू करण्यात आले होते.
या मोजणीसाठी १५ डिसेंबर रोजी सर्व अधिकारी चिपी विमानतळ आले होेते. मात्र, त्याआधीच प्रकल्पग्रस्त शेतकरी व भूमी बचाव समितीचे सभासद शेकडोच्या संख्येने उपस्थित होते. या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी चुकीच्या पध्दतीने करण्यात येणाऱ्या मोजणी प्रकिे्र येला विरोध दर्शवित मोजणी थांबविली. यावेळी समिती अध्यक्ष चंद्रवर्धन आळवे, हनुमंत राठिवडेकर, चिपी सरपंच प्रकाश चव्हाण, परूळे सरपंच प्रदीप प्रभू आदी सहभागी होते. जमीन मोजणी संबंधात संबंधित विभागाने सीमेलगतच्या खातेदारांना नोटिसा बजाविल्या होत्या. परंतु शेतकरी भूमी बचाव समितीशी कोणताच पत्र व्यवहार केला नव्हता. या संदर्भात कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरताच माफी मागितली.
यावेळी समितीच्यावतीने या संदर्भात उपस्थित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात ही जमीन मोजणी प्रक्रिया चुकीची असून जनतेची दिशाभूल करणारी असल्याचे स्पष्ट केले आहे. (वार्ताहर)