नारायण राणेंचे ठाकरे सरकारला सात टोमणे; चिपी विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमात केली तुफान टोलेबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2021 02:58 PM2021-10-09T14:58:07+5:302021-10-09T15:00:20+5:30
सिंधुदुर्गात वाईट बुद्धीने यायचे आणि जायचे हे सोपे नाही. नुसतं महाराजांचं नाव नको त्यांच्यासाठी कामही कराव लागेल. तरच त्यांचे गुण आत्मसात करण्याचा मानस होईल.
सिंद्धुदुर्ग - चिपी विमानतळ उद्घाटनासाठी आज केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी नारायण राणे यांनी जोरदार फटकेबाजी केली. त्यांनी सिंद्धुदूर्गमध्ये स्वतः केलेल्या विकासकामाचा पाढाही वाचला आणि विकास कामांवरून ठाकरे सरकारला टोमणेही मारले.
मुख्यमंत्री कानात बोलले, पण...
राणे म्हणाले, हा माझ्या जीवनातील अत्यंत महत्वाच क्षण आहे. या वेळी कुठलेही राजकारण करू नये, असे मला वाटत होते आणि आकाशात उडणारे विमान डोळे भरून पाहावे, असे वाटत होते. म्हणून स्तुत्य हेतूने मी या कार्यक्रमासाठी आलो आहे. मंचावर येताना मुख्यमंत्री साहेबही मला भेटले. ते माझ्या काणातही काही बोलले. पण मी ते ऐकले नाही. असो, परदेशातून पर्यटक येथे यावेत, येथील लोकांना रोजगार मिळावा. येथील लोक समृद्ध व्हावेत यासाठी या विमानतळासाठी प्रयत्न केले.
हे सर्व साहेबांचेच श्रेय माझे नाही -
मी १९९० साली जिल्ह्यात आलो, तेव्हा जिल्ह्यात, पाण्याचा प्रश्न होता, रस्त्ये व्यवस्थित नव्हते, शाळा व्यवस्थित नव्हत्या, विजेचा प्रश्न होता. लोक आंधारात राहायचे. सिंद्धुदुर्ग मुंबईवर अवलंबून होता. यानंतर, या भागाचा विकास मी केला. उद्धवजी हे सर्व मी साहेबांच्या प्रेरणेतून करत होतो. यात माझा कसलाही स्वार्थ नव्हता. एथे एकाच वेळा मी तीनशे हून अधिक शिक्षक आणले होते. पण तेव्हा मी शिवसेनेत होते. ते सर्व सायबांचेच श्रेय, माझं नाही.
ठाकरे सरकारला राणेंचे टोमणे -
- सन्माननीय आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री आहेत. त्यांनी इथला अभ्यास करावा. 481 पानांचा टाटांचा रिपोर्ट वाचावा. निसर्ग कसा ठेवावा, पायाभूत संरचना कशा उभ्या कराव्यात. हे समजून घ्या आणि त्यासाठी पैसे द्या. धरणाला एक रुपया दिला नाही. माझ्या वेळी जेवढी धरणाची कामं झाली, त्याच्या पुढे काम गेलेले नाही. काय विकास?
- येथेही एअरपोर्टला पाणी नाही, विजेची लाईन नाही, ३४ कोटींचा रस्ताही नाही, कसला विकास?
- विमानतळ झाले, पण उतरल्यावर लोकांनी काय पाहावे? हे खड्डे? विमानतळाचे उद्घाटन करण्यापूर्वी हे रस्ते आणि बाकीच्या गोष्टी एमआयडीसीने करायला हव्यात.
- उद्धवजी, एक विनंती आहे. याच जागेवर मी आणि प्रभू १५ ऑगस्ट २००९ रोजी भूमिपूजन करण्यासाठी आलो होतो. तेव्हा समोर आदोलन होत होते, भूमिपूजन होऊ देणार नाही, आम्हाला विमानतळ नको. विरोध होत होता. किती विरोध होत होता. मी नावे घेतली तर राजकारण होईल.
- सीवर्ल्डच्या अधिग्रहणासाठी अजित पवारांनी १०० कोटी रुपये दिले. त्याचे काय झाले? कुणी रद्द केले? तेथे कोण आंदोलन करत होते? आहेत स्टेजवर. भांडे काय फोडायचे, किती फोडायचे? तुम्ही समजताय तसे येथे नाही. तेव्हा होते, आज नाही. म्हणून परिस्थिती बदलते आहे. मला फक्त म्हणायचेय, आपण आलात, मला बरे वाटले.
- आदित्य ठाकरे माझ्या दृष्टीने टॅक्स फ्री आहेत, मी काही बोलणार नाही. मी त्यांना शुभेच्छा देईन. उद्धवजींना अभिप्रेत काम करुन दाखवा, मला आनंद वाटेल. सर्वांचे स्वागत करतो.
- सिंधुदुर्गात वाईट बुद्धीने यायचे आणि जायचे हे सोपे नाही. चांगल्या मनाने या, निसर्गाचा आनंद घ्या. छत्रपतींच्या पदस्पर्शाने हा जिल्हा पावन झाला आहे. त्या नावाप्रमाणे आपण संकल्प करुया. किल्ल्याची डागडुजी करून दाखवा. चांगले काहीतरी करून दाखवा. नुसतं महाराजांचं नाव नको त्यांच्यासाठी कामही कराव लागेल. तरच त्यांचे गुण आत्मसात करण्याचा मानस होईल.
येथील लोकांचा विकास करण्यासाठी नेहमीच प्रयत्न करीन -
मुख्यमंत्र्यांकडे मागणी करतो, विमान तळाच्या आजूबाजूला सुशोभीकरण आवश्यक आहे. त्यासाठी निधी द्या. अजित दादा पैसे द्या. या परिसराचा विकास व्हायला हवा. येथील लोकांचा विकास करण्यासाठी मी नेहमीच प्रयत्न करीन. केंद्रात उद्योग मंत्री आहे. ८० टक्के उद्योग माझ्याकडे येतात. समुद्र किनारी काय काय उद्योग होऊ शकतात. त्यासाठी मार्गदर्शन करा. त्यासाठी एमआयडीसीची साथही आवश्यक आहे. हा जिल्हा सुजलाम सुफलाम करणे माझा उद्देश आहे. कितीही आडचणी निर्माण केल्या तरी मी त्याची दखल घेत नाही, असेही राणे म्हणाले.
हेही वाचा -
- Chipi Airport : या विमानतळाचा इतिहास मोठा, एकट्या दुकट्यानं काही होत नाही - अजित पवार
- जगातील प्रत्येक कोपऱ्यातून पर्यटक कोकणात येईल, यावर भर देणार; आदित्य ठाकरेंची ग्वाही