पूरमुक्तीसाठी चिपळूणकरांचा लढा; बचाव समितीचे साखळी उपोषण सुरु, नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2021 02:38 PM2021-12-06T14:38:45+5:302021-12-06T14:46:31+5:30
चिपळुणात २२ व २३ जुलै रोजी आलेल्या महापुराने संपूर्ण चिपळूण उद्धवस्त झाले होते. भविष्यात चिपळूणला पुरमुक्त करण्यासाठी बचाव समितीने आपल्या विविध मागण्यासाठी आज, सोमवारपासून साखळी उपोषण सुरु केले आहे.
चिपळूण : चिपळूणच्या पूरमुक्तीसाठी चिपळूण बचाव समितीने आज, सोमवारपासून सुरु केलेल्या साखळी उपोषणाला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या साखळी उपोषणानिमित्त येथील बाजारपेठ बंद ठेवून व्यापाऱ्यांनीही शेकडोंच्या संख्येने सहभाग घेतला आहे. आपल्या सर्व मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा पुन्हा एकदा समितीने दिला आहे. या आंदोलनकर्त्यांची आमदार शेखर निकम यांनी भेट घेतली आहे. समितीच्या मागण्यांविषयी राज्य शासनाकडे पाठपुरावा करू असे आश्वासन आमदार निकम यांनी यावेळी आंदोलनकर्त्यांना दिले. नगर परिषद समोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या आंदोलनाला सुरुवात केली. येथील प्रांत कार्यालयासमोर हे साखळी उपोषण सुरु आहे.
चिपळुणात २२ व २३ जुलै रोजी आलेल्या महापुराने संपूर्ण चिपळूण उद्धवस्त झाले. भविष्यात चिपळूणला पुरमुक्त करण्यासाठी वाशिष्ठी नदीचा गाळ काढणे हा त्यावरील मुख्य पर्याय आहे. यासाठी चिपळूण बचाव समितीने विविध मागण्या शासनाकडे केल्या आहेत. यामध्ये वाशिष्ठी व तिच्या उपनद्या उगमस्थानापासून मुखापर्यंत गाळ काढणे करीता आवश्यक अध्यादेश काढून आर्थिक नियोजन करणे, चिपळूण व परिसराला उध्वस्त करणारी लाल आणि निळी रेषा रद्द करा, नियोजनबद्ध पद्धतीने प्रत्यक्ष गाळ काढण्यास सुरुवात करा या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
त्याचबरोबर ग्रामीण भागातील नदी नाले, पन्हे यांचा गाळ काढणे, आवश्यक तेथे पूर नियंत्रक बंधारे बांधणे, वाशिष्ठी वळण बंधारा गाळमुक्त करणे, अतिवृष्टी असताना भरती काळात विद्युत निर्मिती बंद करणे, प्रत्यक्ष कार्यस्थळी नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करणे, नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती धरण क्षेत्रात व्हावी, जास्त विद्युत निर्मितीचे पाणी दुसरीकडे वाळवावे, नियमानुरुप आपत्ती व्यवस्थापन करणे, आपत्ती काळात धोक्याची सूचना देणारी यंत्रणा प्रत्येक ठिकाणी बसवणे, पाण्याची गती व गेज मोजणारी स्वयंचलित आधुनिक यंत्रे बसवणे, ठिक ठिकाणी स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्रे बसविणे आदी मागण्या केल्या आहेत.