चिरेखाण मालकांना चुना

By Admin | Published: November 16, 2015 10:27 PM2015-11-16T22:27:36+5:302015-11-16T23:59:25+5:30

लांजा तालुका : मजूर पुरवण्याच्या आमिषाने फसवणूक

Chirakhana owners chose | चिरेखाण मालकांना चुना

चिरेखाण मालकांना चुना

googlenewsNext

लांजा : चिरेखाणीवर मजूर आणून देतो, असे सांगून एक नव्हे तर तब्बल पाच व्यापाऱ्यांना १२ लाखांना चुना लावून पोबारा केलेल्या मुकादमाविरोधात व्यापाऱ्यांनी लांजा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
तालुक्यातील विविध गावांमध्ये चिरेखाणीचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना लक्ष्मण जानू राठोड या कर्नाटकातील मुकादमाने तब्बल १२ लाखाला चुना लावला आहे. याबाबत शनिवार व रविवार दोन दिवस शोध घेऊनही तो न सापडल्याने या व्यापाऱ्यांनी लांजा पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली आहे.
लांजा तालुक्यात चिरेखाणींची संख्या जास्त आहे. मात्र त्यासाठी लागणारे कामगार वेळेवर मिळत नसल्याने कामगार बाहेरून आणावे लागतात. हीच संधी साधून राठोड याने चिरेखाणीसाठी कामगार पुरवण्याचे आमिष दाखवले आणि आपला हेतू साध्य करून घेतला. त्याने या कामगारांना आगाऊ रक्कम द्यायचे आहेत, असे सांगून पैसे उकळले आणि या मालकांकडून त्याने लाखो रुपये काढून घेतले.
पैसे घेताना राठोड या मुकादमाने एकूण पाच व्यापाऱ्यांकडून २०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर गडीमाणसे पुरवण्याचा करार करून दिला आहे. एकासोबत करार करताना दुसऱ्या व्यापाऱ्याला याची काहीच खबर लागणार नाही याची दक्षता त्याने घेतली होती. मात्र, ज्यांच्याशी त्याने करार केले होते, ते मात्र संबधित मुकादम गडीमाणसे कधी आणणार? याची वाट पाहत होते. त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्याचा मोबाईल बंद होता.
त्यामुळे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्यांनी आपल्या इतर व्यावसायिकांकडे लक्ष्मण राठोड याची चौकशी केली. त्यावेळी त्याने एक नव्हे तर तब्बल पाच व्यापाऱ्यांना गंडा घातल्याची घटना समोर आली.
शनिवार १४ नोव्हेंबरपासून तालुक्यातील चिरेखाण व्यापारी आणि ठेकेदारांनी लक्ष्मण राठोड याची रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात शोधाशोध केली. मात्र तो सापडू शकला नाही. तो नेमका कुठला? हे कोणालाही माहीत नसल्याने त्याला शोधणाऱ्यांची दमछाक झाली आहे. कर्नाटक आणि पश्चिम महाराष्ट्रातील अन्य चिरे व्यावसायिकांना मजूर पुरवणाऱ्या अन्य मुकादमांकडे चौकशी करण्यात आली. मात्र, त्याच्याबाबत काहीच थांगपत्ता लागू शकला नाही. याबाबत लांजा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

राजन साळवी : ...तर काम करू देणार नाही
पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातून गेली अनेक वर्ष कोकणात कामगार येतात. त्याना रोजगार मिळतो. मात्र, चिरेखाण मालकांकडून लाखो रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली जात असल्यास आम्ही गप्प बसणार नाही. चिरेखाण व्यावसायिकांना मजूर पुरवणाऱ्या मुकादमाने लांजा तालुक्यातील व्यापाऱ्यांकडून १२ लाखांची रक्कम घेऊन पळ काढला आहे. त्या व्यक्तीला शोधून आणले पाहिजे अन्यथा यापुढे लांजा, राजापूर भागात कर्नाटक आणि पश्चिम महाराष्ट्रामधील कामगारांना काम करू देणार नाही, असा सज्जड इशारा आमदार राजन साळवी यांनी दिला आहे


परप्रांतियांचे वर्चस्व
चिरेखाण व्यवसायासाठी स्थानिक कामगार मिळत नसल्याने लांजा तालुक्यात परप्रांतिय कामगार आणावे लागत आहेत.

Web Title: Chirakhana owners chose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.