चित्ररुप शिवसृष्टी हा शिवसंस्काराचा खजिना
By admin | Published: February 4, 2015 09:38 PM2015-02-04T21:38:28+5:302015-02-04T23:51:50+5:30
राजेश बेंडल : पालपेणेतील चित्र जपण्याची स्वीकारली जबाबदारी...
गुहागर : चित्ररुप शिवसृष्टीच्या निर्मितीतून ग्रामस्थ, शिक्षक व कलाकारांनी इथल्या मातीत शिवसंस्कार रुजवण्याचे आदर्शवत काम केले आहे. शिव संस्कारांचा हा खजिना विद्यार्थी व तरुणांना नेहमीच स्फूर्तिदायक ठरावा, यासाठी त्याचे जतन करण्याची जबाबदारी पंचायत समितीचे सभापती या नात्याने आपण स्वीकारत असल्याचे प्रतिपादन सभापती राजेश बेंडल यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण जीवनपट गुहागर तालुक्यातील पालपेणे नं. २ने ग्रामस्थ, शिक्षक, चित्रकार आणि विद्यार्थी यांच्या सहकार्यातून चित्ररुपाने साकारला आहे. या चित्ररुप शिवसृष्टीचे उद्घाटन सह्याद्री शिक्षण संस्थेच्या कला शाखेचे माजी प्राचार्य प्रकाश राजेशिर्के यांच्याहस्ते झाले. यावेळी सभापती बेंडल बोलत होते. इतिहास संशोधक, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा शिरगावकर यांच्याहस्ते शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपसभापती सुरेश सावंत, शिवतेज फाऊंडेशनचे अॅड. संकेत साळवी, शिक्षण विस्तार अधिकारी डी. डी. इरनाक, केंद्रप्रमुख एन. आर. लोहकरे, मुख्याध्यापक पवार उपस्थित होते.केवळ पुस्तकी ज्ञान न देता शाळेने ही शिवसृष्टी साकारुन शिवरायांचे अफाट कर्तृत्व विद्यार्थ्यांसमोर जिवंत केले आहे. शिव संस्काराचा हा खजिना विद्यार्थ्यांना, परिसरातील तरुणांना मार्गदर्शक ठरणार आहे. त्यामुळे येथील शिक्षक, नागरिक आणि ज्यांनी ही शिवसृष्टी आपले प्राण ओतून जिवंत केली त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. आता जबाबदारी आमची आहे. भिंतीवर काढलेली ही चित्र कायम सुस्थितीत राहतील, याची व्यवस्था करण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून आवश्यक तो निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी ग्वाही बेंडल यांनी दिली.सह्याद्री कॉलेज आॅफ आर्टस्चे माजी प्राचार्य, कलाशिक्षक प्रकाश राजेशिर्के म्हणाले, कोणत्याही प्रकारचे तांत्रिक शिक्षण न घेता मेहनती तरुण चित्रकारांनी सादर केलेली कला वाखाणण्याजोगी आहे.इतिहास संशोधक अण्णा शिरगावकर म्हणाले की, शिवरायांचे कर्तृत्व वर्णावे तितके थोडे आहे. त्यांच्या शौर्याला तर तोड नव्हतीच, पण त्यांचे नियोजन कौशल्य, न्याय व्यवस्था, वनक्षेत्राचे संरक्षण, स्त्रियांविषयी आदर, तत्काळ आणि न्याय शासन पद्धती, रयतेबद्दलची अपार कणव या सगळ्यातून त्यांच्यासारखा आदर्श राजा दुसरा होणे नाही. या सर्वच बाबी चित्रांमधूनही साकारल्या अहेत. शिवाजी महाराजांचा त्यांच्या अफाट कर्तृत्त्वामुळे गौरव तर होतच राहणार आहे. आता गरज आहे ती त्यांच्या कर्तृत्त्वाचा आदर्श घेऊन स्वत:पासून आदर्श समाज निर्माण करण्याची. यावेळी उपसभापती सुरेश सावंत, अॅड. संकेत साळवी यांनी चित्रकार, शाळा व्यवस्थापन आणि ग्रामस्थांचे कौतुक केले. याप्रसंगी चित्रकार प्रवीण वेळणस्कर, भालचंद्र घाणेकर, राजू सुर्वे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मनोहर पवार यांनी केले. दीपक साबळे व राजू पवार यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)