राणे समर्थकांना मनसेचा पर्याय
By admin | Published: July 3, 2014 11:55 PM2014-07-03T23:55:00+5:302014-07-03T23:58:55+5:30
शैलेश भोगले : नीतेश राणेंनी केला कार्यकर्त्यांचा अपमान
कणकवली : लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची कारणीमिमांसा करताना नीतेश राणे यांनी काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी ठेकेदार बनल्याने नीलेश राणे यांचा पराभव झाल्याचे मान्य केले आहे. गेली २५ वर्षे नारायण राणेंसोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांचा त्यामुळे एकप्रकारे अपमानच झाला आहे. अशी टीका करतानाच राणे समर्थकांनी खऱ्या अर्थाने स्वाभिमानला आता आपला स्वाभिमान दाखवावा आणि मनसेसारखा चांगला पर्याय निवडावा, असे आवाहन मनसेचे जिल्हाध्यक्ष शैलेश भोगले यांनी केले.
कणकवली येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाध्यक्ष जयसिंग नाईक, अनिल राणे, समीर आचरेकर, शैलेंद्र नेरकर उपस्थित होते. शैलेश भोगले पुढे म्हणाले, नीलेश राणे यांचा पराभव रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झाला हे नीतेश यांनी मान्य केले. बंधुप्रेमापोटी आपल्या कार्यकर्त्यांना व नेत्यांना ते दोष देत आहेत. गेली २५ वर्षे ही स्थिती अशीच असताना पालकमंत्री अथवा नीतेश राणे यांना त्याची जाणिव झाली नाही. रस्त्यावरील खड्ड्यांकडे दुर्लक्ष करून आपण विकास करतो आहे असे भासविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. सिंधुदुर्गात पर्यटन हा महत्वाचा मुद्दा असताना रस्ते दर्जेदार व सुस्थितीत असणे आवश्यक होते.
नजिकच्या गोवा राज्याचा विकास पर्यटनामुळे झाला हे माहित असतानाही सिंधुदुर्गात मात्र राणे यांच्याकडून जाणूनबुजून याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. मनसेने रस्त्यावरील खड्ड्याचा प्रश्न तसेच समर्थकांच्या दहशतीविषयी आवाज उठविला होता. यावेळी मनसे जनतेची दिशाभूल करीत असल्याचे काँग्रेसवाल्यांचे म्हणणे होते. मात्र, पराभवानंतर काँग्रेसला ठेकेदारांनी घेरले आहे, असे सांगितले जात आहे. इतकी वर्षे राणे यांनी ठेकेदरांच्या बळावर राजकारण केले. असेच एकप्रकारे त्यांनी मान्य केले आहे. राणेंसाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालणारे समर्थक त्यांच्यासमवेत शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेले. मात्र, आपण ही मोठी चूक केल्याची भावना या समर्थकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यांना लाचारपणाचे जगणे जगावे लागत आहे. कार्यकर्ता हा भाऊ अथवा मित्र असल्याची भावना आवश्यक असताना ते नोकर आहेत असे नीतेश राणे यांना वाटत आहे. त्यामुळे समर्थकांनी आपला स्वाभिमान जागृत करावा. त्यांनी मनसेसारखा चांगला पर्याय स्वीकारल्यास प्रामाणिक कार्यकर्त्यांचे आम्ही स्वागतच करू, असेही भोगले म्हणाले. (वार्ताहर)