जिल्हा बँक अध्यक्षपदी चोरगेच
By admin | Published: May 21, 2015 11:57 PM2015-05-21T23:57:21+5:302015-05-22T00:08:02+5:30
उपाध्यक्षपदी बाबाजी जाधव : अपेक्षेप्रमाणे निवडणूक बिनविरोध
रत्नागिरी : जिल्हा बॅँक निवडणुकीत सहकार पॅनेलने पुन्हा सत्ता संपादन केल्यानंतर बॅँकेच्या अध्यक्षपदी डॉ. तानाजी चोरगे, तर उपाध्यक्षपदी बाबाजी जाधव यांची गुरुवारी बिनविरोध फेरनिवड झाली. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रसाद उकर्डे यांच्या उपस्थितीत ही निवडणूक प्रक्रिया झाली.
जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी, कॉँग्रेस व भाजप उमेदवारांचा समावेश असलेल्या सहकार पॅनेलने पुन्हा एकदा बाजी मारली. २१ पैकी १६ जागा जिंकल्यानंतर पुन्हा एकदा डॉ. चोरगे हे अध्यक्ष होणार, हे स्पष्ट झाले होते. त्यानुसार गुरुवारी ही निवडणूक बिनविरोध होऊन चोरगे यांच्या अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब झाले आहे.
अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीसाठी नवनिर्वाचित संचालकांची गुरुवारी सकाळी ११ वाजता बॅँकेच्या सभागृहात बैठक बोलावण्यात आली होती. सभेच्या सुरुवातीला डॉ. चोरगे यांनी अध्यक्षपदासाठी, तर बाबाजी जाधव यांनी उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. मधुकर टिळेकर व संजय रेडीज यांनी दोघांनाही अनुक्रमे सूचक म्हणून स्वाक्षऱ्या केल्या. शिवसंकल्प पॅनेलच्या संचालकांपैकी कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी उकर्डे यांनी डॉ. चोरगे व जाधव यांची निवड बिनविरोध झाल्याचे घोषित केले.
यावेळी संचालक शेखर निकम, राजेंद्र सुर्वे, अॅड. दीपक पटवर्धन, संजय रेडीज, दिनकर मोहिते, रमेश दळवी, मनोहर सप्रे, अनिल जोशी, सुधीर कालेकर, किरण सामंत, आदेश आंबोळकर, मधुकर टिळेकर, जयवंत जालगावकर, अमजद बोरकर, चंद्रकांत बाईत, नेहा माने, माधुरी गोखले व अन्य संचालक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
नाट्य घडलेच नाही...
बॅँकेच्या उपाध्यक्षपदावरून काही नाट्य घडेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती.
मात्र, डॉ. चोरगे यांनी संचालकांना चांगल्याप्रकारे हाताळल्याने अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही निवड प्रक्रिया पूर्ण झाली.
तरीही उपाध्यक्षपद काही संचालकांना एका वर्षासाठी दिले जाणार की, या पदाचा अडीच वर्षांचा कालावधी राहणार, याबाबतची चर्चा सुरू होती.