सिने नाट्य कलावंत जनार्दन परब यांचे निधन

By admin | Published: April 3, 2016 03:50 AM2016-04-03T03:50:37+5:302016-04-03T03:50:39+5:30

हृदयविकाराचा धक्का : नाट्यक्षेत्रात हळहळ व्यक्त

Cine theater artist Janardan Parab passed away | सिने नाट्य कलावंत जनार्दन परब यांचे निधन

सिने नाट्य कलावंत जनार्दन परब यांचे निधन

Next

कणकवली : जेष्ठ सिने नाट्य कलाकार जनार्दन परब (वय ६८) यांचे शनिवारी सकाळी आठ वाजता मुंबई येथे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.
सिंधुदुर्गमधील हरकुळ खुर्द हे मूळ गाव असलेल्या जनार्दन परब यांनी मराठी रंगभूमी, चित्रपट, तसेच हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. लहानपणापासूनच जनार्दन परब यांना अभिनय कलेची आवड आणि जाण होती. संपूर्ण बालपण कोकणात तर महाविद्यालयीन शिक्षण आणि नोकरीसाठी ते मुंबईत दाखल झाले. तरुण वयातच ते एकांकीका आणि प्रायोगिक नाटकांशी जोडले गेले. नोकरी व शिक्षण सांभाळत आपल्या अभिनयाची हौस आणि आवड अगदी मनापासून जोपासली. विजया मेहतासारख्या नट मंडळींचे मार्गदर्शन याच काळात त्यांना लाभले.
त्यांच्या प्रमुख नाटकांमध्ये ‘अवध्य’, ‘नकटीच्या लग्नाला’, ‘अजब न्याय वर्तुळाचा’, ‘हमिदाबाईची कोठी’, ‘रात्र थोडी सोंग फार’, ‘काका किशाचा’, ‘संगीत विद्याहरण’, ‘मुद्राराक्षस’ तर ‘धुमशान’, ‘नशिबवान खावचो घोव’, ‘कबूतरखाना’सारख्या मालवणी नाटकांमध्ये अभिनयासोबतच काही नाटकांची दिग्दर्शनाची देखील धुरा सांभाळली. अनेक हिंदी-मराठी चित्रपटातील भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. यामध्ये ‘माझा पती करोडपती’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘गम्मत जम्मत’, ‘कुलस्वामिनी तुळजाभवानी’ चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून, हिंदीत ‘कसम’, ‘शिकारी’, ‘ऐलान’, ‘जिद्दी’, ‘क्रांतीवीर’, ‘बाजीगर’, ‘नायक’, ‘गुलाम’, ‘उडान’, ‘चायना गेट’सारख्या चित्रपटांचा उल्लेख करता येईल. क्रांतिवीर चित्रपटातील त्यांचा आणि नाना पाटेकर यांचा प्रसंग आजही स्मरणात आहे.
काही वर्षापूर्वी शारीरिक अस्वास्थ्यामुळे जनार्दन परब यांनी कला क्षेत्रापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता. पण दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी पुन:श्च या क्षेत्रात परतण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अनेक मालिका आणि चित्रपटांमधून भूमिकेच्या माध्यमातून ते आपल्याला दिसत राहिले. मालवणी रंगभूमीला त्यांनी दिलेलं योगदान वाखाणण्याजोगं आहे. नवीन विषय प्रेक्षकांसमोर मांडत, परब यांनी तरुण कलाकारांसोबत मालवणी रंगभूमी पुनर्जिवीत ठेवण्याचं कार्य केलेलं आहे.
अनेक चित्रपटांमधून तसंच दूरचित्रवाणी मालिकांमधून चरित्र अभिनेता म्हणून त्यांचं काम दखल घेण्याजोगे आहे. जनार्दन परब यांनी चार दशकाहून अधिक काळ रंगभूमी व रुपेरी पडद्यासाठी स्वत:ला झोकून दिले.
त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना ‘शंकर घाणेकर पुरस्कार’, २००८ सालचा ‘नटवर्य केशवराव दाते पुरस्कार’ तसेच ‘कॉलेज साहित्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांच्या निधनाने नाट्य क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून आणि दोन नातू असा परिवार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Cine theater artist Janardan Parab passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.