वित्तीय संस्थेच्या व्यवस्थापकास घेराओ
By Admin | Published: November 16, 2015 10:41 PM2015-11-16T22:41:42+5:302015-11-17T00:01:43+5:30
युवक काँग्रेसचा घेराव : लाखोंच्या ठेवी न मिळाल्याने कुडाळातील ग्राहक मेटाकुटीस
कुडाळ : ठेवीची मुदत संपूनही काही महिने, वर्ष लोटले, तरी अनेक ठेवीदारांचे कोट्यवधी रूपये पॅनकार्ड क्लबने ठेवीदारांना अद्याप दिले नाहीत. कुडाळ युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कुडाळ पॅनकार्ड क्लब कार्यालयाला घेराव घालून याबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला. या प्रकरणी कुडाळ पोलिसात गेल्यावर दोन दिवसात याबाबत वरिष्ठांसमवेत बैठक लावून निर्णय देतो, असे पॅनकार्ड अधिकाऱ्यांनी कबूल करताच गुरूवारपर्यंत आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
दामदुपटीने पैसे मिळणार, असे सांगत ठेवीदारांचे पैसे गुंतविणाऱ्या कुडाळ येथील पॅनकार्ड क्लबमध्ये पैसे गुंतविलेल्या ठेवीदारांच्या पैशांची मुदत संपून जवळपास वर्ष उलटले, तरी अद्यापही त्यांचे पैसे परत देण्यात आलेले नाहीत.
ठेवीदार मात्र आपल्या पैशांसाठी दररोज या कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. पण आज नाही, दोन दिवसांनी, आठ दिवसांनी या अशी उत्तरे या ठेवीदारांना देण्यात येत असल्याने ठेवीदार हैराण व चिंताग्रस्त झाले आहेत. पैसे द्यायची मुदत संपूनही वर्ष लोटले. काही महिने लोटले, तरी अजूनही ठेवीदारांचे पैसे परत दिले नाहीत. ठेवीदार चिंतेत आहेत, हे कुडाळ युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना समजताच युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुनील बांदेकर, नागेश नेमळेकर, अमित राणे, सिध्देश वर्दम, सुमेध साळवी, अमेय शिरसाट यांच्यासहीत युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पॅनकार्डच्या कार्यालयामध्ये जात अधिकाऱ्यांना घेराव घातला. मुदत संपली, तरी पैसे द्यायला वेळ का लागतो, याबाबत कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जाब विचारला. यावेळी पॅनकार्ड कार्यालयाचे अधिकारी विजय साटेलकर यांना समर्पक उत्तरे देता आली नाहीत. अखेर तेथे उपस्थित असलेल्यांनी हा वाद कुडाळ पोलीस ठाण्यात नेला.
कुडाळ पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण पवार, सचिन पवार यांनी आंदोलनकर्ते, ठेवीदार व पॅनकार्डच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर उपस्थित ठेवीदारांनी आम्हाला आमचे पैसे लवकरात लवकर परत पाहिजेत, अशी ठाम भूमिका घेतली. त्यानंतर पोलिसांनी पॅनकार्डचे अधिकारी, ठेवीदार, एजंट व युवक काँग्रेसचे पदाधिकारी यांची दोन दिवसात यासंंबंधी बैठक लावा व यासंदर्भात ठेवीदारांना योग्य ती माहिती द्या, असे आदेश दिले.
पॅनकार्ड क्लबची सद्यस्थिती पाहता पैसे देण्याची मुदत संपून अनेक महिने लोटले, तरी मोठ्या प्रमाणात ठेवीदारांचे पैसे परत केलेले नसल्याची चर्चा होत होती. त्यामुळे पॅनकार्ड क्लबमुळे ठेवीदारांचे कोट्यवधी रूपये बुडणार की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.
बंगले, गाड्या विकून पैसे द्या
पॅनकार्ड क्लबच्या सदस्यांनी आमचे पैसे घेऊन बंगले बांधले. गाड्या घेतल्या. तुम्ही ऐशआरामात जीवन जगता आहात. आता आमचे पैसे द्यायला मात्र टाळाटाळ करता. आम्हाला बाकी काही माहीत नाही. तुम्ही तुमचे बंगले, गाड्या विका आणि काहीही करून आमचे पैसे द्या, असेही उपस्थित ठेवीदारांनी पॅनकार्डच्या अधिकाऱ्यांना सुनावले. (प्रतिनिधी)