विकास आराखड्यावरून नागरिक आक्रमक
By admin | Published: September 6, 2015 08:58 PM2015-09-06T20:58:29+5:302015-09-06T20:58:29+5:30
ंमालवणमध्ये नगरसेवकांना घेरले : मेढा मौनिनाथ मंदिरात बैठक
मालवण : शहरात प्रस्तावित विकास आराखड्यावरून नागरिकांची विरोधाची धार तीव्र होत आहे. प्रभागनिहाय बैठका घेऊन विकास आराखड्याला विरोध होत आहे. निवडणुकीनंतर चार वर्षांनी एकत्र येणाऱ्या सर्व नगरसेवकांना नागरिकांनी घेरले. खड्डेमय रस्ते, स्ट्रीट लाईट, कचरा, अर्धवट भुयारी गटार योजना या समस्यांचा पाढा वाचत नगरसेवकांना लक्ष्य केले. दरम्यान, शहर विकास आराखड्यातील वाढीव रस्ता रुंदीकरण व प्रस्तावित आरक्षणे यावर सामूहिक तसेच वैयक्तिक हरकती नोंदविण्यावर एकमत झाले.येथील मेढा मौनिनाथ मंदिर येथे शहर विकास आराखड्याला विरोध दर्शविण्यासाठी रविवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी नगरसेवक महेश जावकर, महेंद्र म्हाडगुत, महानंदा खानोलकर, ममता वराडकर, गणेश कुशे तसेच मेढा, राजकोट भागातील नागरिक उपस्थित होते. महेश जावकर यांनी विकास आराखडा प्रसिद्ध होण्यापूर्वी नगरपरिषदेत घेण्यात आलेल्या ठरावाचे वाचन करीत प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाची माहिती देण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांची लांबलेली माहिती गणेश कुशे यांनी थांबवत आम्ही तुमचे कीर्तन ऐकायला आलो नाही, नगरसेवकांनी कोणतीही स्पष्ट भूमिका न मांडल्यानेच हा आराखडा जनतेच्या मुळावर उठला आहे, असे सांगितले. काही नागरिकांनी नगरसेवकांना आमच्या मागण्या पूर्ण करणे शक्य नाही झाले तर जागा दाखवून देऊ, अशी भूमिका घेतली. नगरसेवकांना घेरले बैठकीत नागरिकांनी आपल्या समस्यांचा पाढा वाचला. चार वर्षांनंतर सगळे नगरसेवक एकत्र आले आहेत. निवडणुकीच्यावेळी मते मागितल्यानंतर हे एकत्र दिसत आहेत. शहरातील रस्ते, स्ट्रीट लाईट, कचरा, डास फवारणी या समस्या नगरसेवकांना का दिसत नाहीत? असे सांगत महिला नगरसेवकांनाही धारेवर धरले.
ग्रामीण रुग्णालयाकडे लक्ष द्या
तुमचा विकास आराखडा बाजूला ठेवा. अगोदर ग्रामीण रुग्णालयात ज्या समस्या आहेत, त्या दूर करा, असे बैठकीदरम्यान एका ज्येष्ठ नागरिकाने सांगितले. यावर नागरिकांनीही पाठिंबा देत शहर विकास आराखड्यास एकत्र येऊन हरकती नोंदवूच, पण त्याबरोबर शहरातील समस्या दूर करण्यासाठी लक्ष देणे गरजेचे आहे, असे सांगण्यात आले.