चोरीच्या घटनांमुळे नागरिक भयभीत

By admin | Published: June 21, 2017 12:26 AM2017-06-21T00:26:04+5:302017-06-21T00:26:04+5:30

तपासात पोलिसांना अपयश : सीसीटीव्ही कॅमेरे बंद; चोरट्यांचे फावले

Citizens are afraid of theft incidents | चोरीच्या घटनांमुळे नागरिक भयभीत

चोरीच्या घटनांमुळे नागरिक भयभीत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कणकवली : तालुक्यातील साकेडी-फौजदारवाडी येथील घर फोडून झालेली चोरी व कणकवली शहरातील नरडवे नाका येथे महिलेच्या अंगावरील तीन तोळ्याची सोन्याची माळ चोरल्याबाबत कणकवली पोलिसांच्या हाती अजून काहीही सुगावा लागलेला नाही. शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यामुळे चोरट्यांचे चांगलेच फावले आहे.
साकेडी येथील मारुती राणे यांच्या घरातील १ लाख ९0 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची घटना सोमवारी सकाळी १0.३0 ते दुपारी १२.३0 च्या दरम्यान घडली होती. तर कणकवली शहरातील नरडवे नाका येथे बिजलीनगर येथील वंदना दिनकर मुसळे या महिलेला पोलीस असल्याचे भासवून तिच्या गळ्यातील ३ तोळ्याची माळ चोरट्यांनी लंपास केली होती. हा चोरीचा प्रकार सोमवारी सायंकाळी ६.३0 च्या दरम्यान घडला होता. शनिवार १७ जून रोजी रात्री हर्ष कॅफे फोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला होता. या तिन्ही चोरींप्रकरणी पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेत आहेत. सोमवार १९ जून रोजी सकाळी दिवसाढवळ्या साकेडी येथील घर फोडून सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले होते. एकापाठोपाठ एक चोरीच्या घटना घडू लागल्यामुळे नागरिकांनी भीती व्यक्त केली आहे. पोलीस असल्याचे सांगून महिलांच्या गळ्यातील दागिने कागदात बांधून ती पुडी महिलेला देण्यात येते. या घटना वारंवार घडत असताना महिलांमध्ये जनजागृती होत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
पोलीस निरीक्षकांचे आश्वासन
आमदार नीतेश राणे यांनी एक वर्षापूर्वी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. त्यामुळे शहरातील असे भुरटे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होत होते. आता मात्र सीसीटीव्ही कॅमेरेच बंद असल्यामुळे चोरट्यांचे पुन्हा फावले आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मुदत एक वर्ष असल्यामुळे मुदतीपर्यंत ते चालले. मात्र आता पुन्हा त्यांची मुदत वाढवून घेणे आवश्यक आहे. या बाबतीत लक्ष घालण्यात येईल व सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा सुरू करण्यात येतील, असे पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.


 

Web Title: Citizens are afraid of theft incidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.