corona virus -कोरोनासदृश लक्षणे असल्यास नागरिकांनी तपासणीसाठी पुढे यावे : के. मंजुलक्ष्मी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 06:31 PM2021-02-23T18:31:19+5:302021-02-23T18:32:53+5:30
corona virus Collcator Sindhudurg- ताप आला असल्यास नागरिक शासकीय रुग्णालयात जात नाहीत. तपासणी करायला तयार होत नाहीत. मात्र, यामुळे आपल्यापासून दुसऱ्या व्यक्तीला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कोरोनासदृश लक्षणे असलेल्या नागरिकांनी स्वतःहून तपासणीसाठी पुढे यावे. खासगी डॉक्टरांनीही त्यांच्याकडे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना तपासणी करण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.
ओरोस : ताप आला असल्यास नागरिक शासकीय रुग्णालयात जात नाहीत. तपासणी करायला तयार होत नाहीत. मात्र, यामुळे आपल्यापासून दुसऱ्या व्यक्तीला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कोरोनासदृश लक्षणे असलेल्या नागरिकांनी स्वतःहून तपासणीसाठी पुढे यावे. खासगी डॉक्टरांनीही त्यांच्याकडे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना तपासणी करण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, जिल्ह्यात कोरोनाचा कहर कमी झाला असला तरी अद्यापही नागरिक कोरोनाबाबत तपासणी करण्यासाठी पुढे येत नाहीत. ताप आला असल्यास तो लपविण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, या प्रकारात तपासणी न झाल्याने आपल्याला कोरोना आहे हे समजत नाही आणि आपल्याकडून हा आजार मित्र, नातेवाईक, कुटुंब आणि जनतेमध्ये पसरत जातो. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्याला तापसदृश लक्षणे असल्यास शासकीय रुग्णालयात जाऊन कोरोना टेस्ट करून घ्यावी. ज्या खासगी डॉक्टरांकडे असे रुग्ण येतात त्यांनी त्या रुग्णांना कोरोना टेस्ट करण्यासाठी सांगावे.
गोवा, केरळ, राजस्थान व दिल्ली येथून येणाऱ्या नागरिकांची आरटीपीसीआर तपासणी करूनच प्रवेश दिला जाणार आहे, असेही के. मंजुलक्ष्मी यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यात ७६३१ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. यातील ६१२ कर्मचाऱ्यांनी दुसरा डोसही घेतला आहे. दुसऱ्या टप्प्यातील पोलीस व महसूल कर्मचाऱ्यांना २४ व २५ फेब्रुवारी रोजी नऊ ठिकाणांवरून लस दिली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
...तर त्यांना थेट रुग्णालयात दाखल करणार
काही वेळा कोरोनाबाधित रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येते. अशा रुग्णांवर तेथील आरोग्य कर्मचारी लक्ष ठेवणार आहेत. मात्र, काही वेळा रुग्ण होम आयसोलेशनचे नियम पाळत नाहीत. अशा रुग्णांना थेट कोविड सेंटरमध्ये दाखल केले जाणार आहे. वरिष्ठ महाविद्यालये सुरू झाली असून, या कॉलेजमधील प्राध्यापक व कर्मचारी यांची लवकरच तपासणी केली जाणार आहे. रेल्वेस्थानकांवर पुन्हा तपासणी पथके तैनात केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.