चीनच्या जहाजामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये : प्रीतेश राऊळ यांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 03:30 PM2020-02-08T15:30:00+5:302020-02-08T15:33:29+5:30
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर चीन येथून रेडी येथे लोह खनिज नेण्यासाठी आलेल्या जहाजामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून मुंबई येथे २८ जानेवारी रोजी या जहाजावरील सर्व कर्मचाऱ्यांची भारत सरकार आरोग्य यंत्रणेमार्फत आरोग्य तपासणी करण्यात आली असून याबाबतचे अहवाल त्यांच्याजवळ देण्यात आले आहेत.
वेंगुर्ला : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर चीन येथून रेडी येथे लोह खनिज नेण्यासाठी आलेल्या जहाजामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून मुंबई येथे २८ जानेवारी रोजी या जहाजावरील सर्व कर्मचाऱ्यांची भारत सरकार आरोग्य यंत्रणेमार्फत आरोग्य तपासणी करण्यात आली असून याबाबतचे अहवाल त्यांच्याजवळ देण्यात आले आहेत.
याशिवाय जिल्हा आरोग्य यंत्रणासुद्धा सतर्क असून रेडी पोर्ट प्रशासनाकडून सर्व कामगारांना मास्क पुरविले आहेत. तसेच त्यांची आरोग्य तपासणीही करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य तथा माजी आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी दिली आहे.
चीनमधील अनेकांचे बळी घेणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे.
दरम्यान, रेडी येथे लोहखनिज नेण्यासाठी चीनमधून जहाज सध्या रेडी बंदरात पोहोचले आहे. या जहाजावर कप्तानासह २२ कर्मचारी असून त्यातील १० कर्मचारी चीन येथील आहेत. तसेच २२ आॅक्टोबरपासून हे जहाज चीनच्या बाहेर असून इंडोनेशिया, आफ्रिका, सिंगापूर, मुंबई करीत रेडी येथे दाखल झाले आहे.
हे जहाज जेटीपासून ४ नॉटिकल आत समुद्रात असल्याने व त्या जहाजावर असलेल्या कामगारांपैकी बहुतांश चिनी कामगार हे महिन्याभरापूर्वीच जहाजावर आल्याने हा कोरोना व्हायरस पसरण्याची शक्यता कमी आहे.
सिमशुल्क विभाग, जिल्हा आरोग्य यंत्रणा, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत सर्व खबरदारी घेत आहे. रेडी येथील स्थानिक कामगारही त्या जहाजावर गेले असून त्यांचे तसेच जहाजावरील सर्व कामगारांची रोज तपासणी करण्यात येणार आहे.