त्रिसदस्यीय गाव बनतंय १७ ‘सेवकां’चे नगर

By admin | Published: October 13, 2015 09:04 PM2015-10-13T21:04:56+5:302015-10-14T00:02:14+5:30

११ सरपंच आणि २ प्रशासक : पन्नाशीत झाली नगरपंचायत, ४0 वर्षे काँग्रेसचा कारभार

The city of 17 'servants' is becoming a three-party village | त्रिसदस्यीय गाव बनतंय १७ ‘सेवकां’चे नगर

त्रिसदस्यीय गाव बनतंय १७ ‘सेवकां’चे नगर

Next

सुपर व्होट १--वाभवे-वैभववाडी -गावाकडून नगराकडे
कालपरवापर्यंत कोल्हापूरी ‘टच’ असलेल्या वाभवे-वैभववाडी गावाचे नगरात रुपांतर होवू घातले आहे. या शहराने अनेक स्थित्यंतरे पाहिली आहेत. तालुक्याच्या मुख्यालयाचे शहर असूनही या शहराच्या विकासाला दिशा देणारे सक्षम स्थानिक नेतृत्व उभे राहू न शकल्याने विकासाचा ‘बॅकलॉग’ मोठा आहे. ग्रामपंचायतीतून नगरपंचायतीत जाताना नागरिकांच्या अपेक्षांचे ओझे नव्या सेवकांवर असणार आहे. त्यामुळे नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने शहराच्या वाटचालीचा आढावा घेण्याचा प्रयत्न...
प्रकाश काळे ल्ल वैभववाडी
गगनबावडा तालुक्यातील ३00 लोकवस्तीच्या वाभवे गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करण्यासाठी तत्कालीन नेतृत्वाच्या प्रयत्नांना १९६५ मध्ये यश लाभले. त्यामुळे वाभवे-एडगाव-वायंबोशी या ग्रुप ग्रामपंचायतीचे खासबाब म्हणून विभाजन होऊन स्वतंत्र वाभवे-वैभववाडी ग्रामपंचायत अस्तित्वात आली. गेल्या पन्नास वर्षात ११ सरपंच आणि २ प्रशासकांनी वाभवे-वैभववाडी ग्रामपंचायतीचा कारभार केला. त्यातील शिवसेना व राष्ट्रवादीचा दहा वर्षांचा कालखंड वगळता उर्वरित ४0 वर्षे काँग्रेसने कारभार केला. विभाजनापूर्वी वाभवे-एडगाव-वायंबोशी ग्रुप ग्रामपंचायतीत ३ सदस्य असणाऱ्या गावाचे आता नगरपंचायतीमुळे १७ सेवकांचे नगर बनणार आहे.
वाभवे-एडगाव-वायंबोशी ग्रुप ग्रामपंचायतीतून विभक्त होऊन वाभवे-वैभववाडीची स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करण्याची मागणी १९६२ च्या सुमारास जोर धरत होती. त्यावेळी या गावाची लोकसंख्या जेमतेम ३00 च्या घरात होती. त्यामुळे लोकसंख्येचा निकष ग्रामपंचायत निर्मितीतील मोठा अडसर होता. त्यावेळी स्वतंत्र ग्रामपंचायतीसाठी शासनाची ६00 लोकसंख्येची अट होती. मात्र, तत्कालीन स्थानिक नेतृत्वाची सचिवालयाशी असलेली जवळीक काहीशी कामी आली. त्यामुळे नांदेडमधील एका नवनिर्मित छोट्या ग्रामपंचायतीच्या संदर्भाने वाभवे-वैभववाडी ही १९६५ मध्ये राज्यातील सर्वात कमी लोकसंख्येची नवीन ग्रामपंचायत अस्तित्वात आली.
वाभवे-वैभववाडी ग्रामपंचायत झाली तेव्हा आताच्या वैभववाडी शहरात लोकवस्ती अगदीच विरळ होती. एका घरात स्वतंत्र ग्रामपंचायतीचे कार्यालय सुरू करण्यात आले होते. वाभवे-वैभववाडीचे पहिले सरपंच म्हणून कै. रावजी गंगाराम रावराणे यांना बहुमान मिळाला. तत्पूर्वी वाभवे-एडगाव-वायंबोशी ग्रुप ग्रामपंचायतीचेही सरपंच तेच होते. त्यावेळी ९ सदस्य असणाऱ्या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये वाभवे गावातून फक्त तीन सदस्य निवडून जात होते. कै. रावजी रावराणे यांचा वाभवे गावावर चांगला प्रभाव होता. त्यामुळे १९६५ ते १९७८ या तेरा वर्षाच्या कालावधीत सरपंच म्हणून त्यांनी यशस्वी कारभार केला.
त्यानंतर जून १९७८ ते जानेवारी १९८0 या काळात सिंधु कदम, जानेवारी १९८0 ते १९८४ गंगाराम रावराणे, १९८४ ते १९८९ वसंत कदम, यांनी सरपंच म्हणून कारभार केला. तो काळ ग्रामपंचायतींच्या अधिकार कक्षा वाढविणारा होता. त्यानंतरच्या पंचवार्षिक निवडणुकीत कै. केशवराव रावराणे यांच्याकडे ग्रामपंचायतीची सूत्रे गेली. त्यांनी १९८९ ते १९९५ या काळात आपल्या परीने ग्रामविकासाला चालना देत केशवराव रावराणेंनी वैभववाडी बाजारपेठच्या विस्तारीकरणावर भर दिला. त्यामुळे गावातील छोट्या पायवाटांचे चांगल्या रस्त्यांमध्ये रुपांतर झाले.
एक वर्ष प्रशासक म्हणूनही केशवरावांनी कारभार पाहिला. त्यानंतर मात्र, बाजारपेठच्या विस्तारीकरणाबरोबरच गावातील पायाभूत सुविधांच्या समस्या वाढत गेल्या. त्या आजमितीस कायम आहेत. १९९५ ते २000 या पाच वर्षात सदानंद माईणकर व २000 ते २00४ सुप्रिया मांजरेकर यांनी सरपंचपद भूषविले. त्यानंतर एक वर्ष वाभवे ग्रामपंचायतीवर प्रशासक होता. २00५ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर २0१0 पर्यंत रमेश चव्हाण व २0१0 ते एप्रिल २0१५ पर्यंत कै. केशवराव यांच्या स्नुषा जयश्री पुरुषोत्तम रावराणे यांनी सरपंच पदाची धुरा सांभाळली. यापैकी शिवसेनेचे सदानंद माईणकर व राष्ट्रवादीचे रमेश चव्हाण यांची पाच-पाच वर्षे वगळता उर्वरित तब्बल ४0वर्षे काँग्रेसने कारभार केला आहे.

जुना डाव : पहिल्यापासून खेळावा लागणार
गेल्या पन्नास वर्षांच्या काळात कोल्हापूर आणि सिंधुदुर्गच्या राजकारणातील अनेक स्थित्यंतरे वाभवे-वैभववाडी गावाने जवळून पाहिली आहेत. पन्नास वर्षापूर्वीचे ३ सदस्यांचे गाव आता १७ सेवकांचे नगर बनणार आहे.
त्यामुळे नगरपंचायत निवडणुकीनंतर नगरविकासाचा श्रीगणेशा करून शहराचे वैभव वाढविण्यासाठी जुना डाव पहिल्यापासून पुन्हा खेळावा लागणार आहे.

Web Title: The city of 17 'servants' is becoming a three-party village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.