शहरवासिय म्हणाले गोव्यातील लोकांना प्रवेश बंद करा... येथूनच महाराष्ट्र हद्द सुरु होते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 04:54 PM2020-04-24T16:54:28+5:302020-04-24T17:03:13+5:30
दोडामार्ग : गोवा सरकारने राज्यात शिथिलता करून राज्य सिमांंवर कडक बंदोबस्त करून महाराष्ट्रवासीयांना गोवा राज्यात नो एन्ट्री घोषित केली. ...
दोडामार्ग : गोवा सरकारने राज्यात शिथिलता करून राज्य सिमांंवर कडक बंदोबस्त करून महाराष्ट्रवासीयांना गोवा राज्यात नो एन्ट्री घोषित केली. त्यामुळे राज्याच्या सीमेवर असलेल्या दोडामार्ग शहरवासीयांनी गोव्याच्या हद्दीवरील गावातील नागरिकांना शहरात प्रवेश देऊ नये. त्यांनाही महाराष्ट्रात येण्यास बंदी करावी. तसेच एखादी व्यक्ती आढळल्यास त्या व्यक्तीला क्वारंटाईन करण्यात यावी अशी मागणी नगरपंचायत प्रशासनाकडे शहरवासीयांनी केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्याने खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या राज्याच्या सीमा बंद केल्या आहेत. गोवा कोरोनामुक्त झाल्यानंतर राज्यात शिथिलता करण्यात आली. मात्र पुन्हा कोरोनाचा शिरकाव गोव्यात होऊ नये यासाठी सरकारने कमालीची खबरदारी घेत राज्याच्या सीमा मात्र सील केल्या आहेत. त्याचा फटका राज्याच्या सीमेवर असलेल्या दोडामार्ग शहराला बसत आहे. गोव्याला लागून महाराष्ट्राची सीमा आहे. आणि दोडामार्ग शहरापासून त्याची सुरुवात होते.
साहजिकच दोन्ही राज्याच्या सीमेवरील गावातील नागरी एकमेकांवर अवलंबून आहेत. गोव्यातील साळ, खोलपे, साळ पुन., गोवा दोडामार्ग, खरपाल, कुमयामळा, आदी गावातील नागरिकांना दोडामार्ग बाजारपेठ लागते. तर दोडामार्गमधील वाहन चालक पेट्रोल व डिझेलसाठी गोव्याच्या सिमेत हाकेच्या अंतरावर असलेल्या पेट्रोल पंपावर अवलंबून आहेत.
मात्र, दोन्हीकडील राज्यांनी मुख्य प्रवेशद्वारावर पोलीस नाके उभारले आहेत. त्यामुळे दोन्हीकडील नागरिक साळ पुनर्वसन मार्गे व कालव्याद्वारे ये-जा करत असत. मात्र आता खोलपे व साळ पुनर्वसन मधील नागरिकांनी ये-जा करण्याची वाटच बंद केली. व गोवा शासनास त्याची माहिती देऊन त्याठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवला. त्यामुळे दोडामार्गमधून जाणाºया नागरिकांची गैरसोय होत आहे. परंतु असे असले तरी दोडामार्ग शहराची हद्द मात्र खुलीच आहे. त्यामुळे गोवा सरकार जर पेट्रोल व तत्सम गोष्टींसाठी आडमुठे धोरण स्वीकारत असेल तर महाराष्ट्रातही गोव्याच्या सीमावर्ती भागातील नागरिकांना महाराष्ट्रात प्रवेश देऊ नये, अशी मागणी शहरवासीयांनी नगरपंचायत प्रशासनाकडे केली.
यावेळी ग्रामस्थांनी पाटील यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली. पाटील यांनी अशा चोरवाटा बंद करण्याबाबत पोलिसांना कळविले जाईल व निश्चितच गोव्याच्या सीमावर्ती भागातील नागरिकांना प्रवेश दिला जाणार नाही अशी ग्वाही दिली.
गोव्यातून मालवणात आलेल्यावर गुन्हा दाखल
मालवण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असताना गोवा-म्हापसा येथून पायी शहरातील मेढा कोथेवाडा येथे दाखल झालेल्या गणेश प्रभाकर परब (३८) या तरूणावर येथील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याची येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद ठेवण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत काहीजण चोरट्या मार्गाने जिल्ह्यात दाखल होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यापूर्वीही आंब्यांच्या गाड्यांमधून तसेच अन्य मार्गाने जिल्ह्यात दाखल झाल्याचे प्रकार उघडकीस आले आहे. या सर्वांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यातच गोवा-म्हापसा येथून २० तारखेला निघालेला गणेश प्रभाकर परब हा तरूण २२ तारखेला सकाळी शहरातील मेढा कोथेवाडा येथे दाखल झाला. याची माहिती आरोग्य विभागाच्या कर्मचाºयांना मिळताच त्यांनी त्याचा शोध घेत आरोग्य तपासणी करण्याच्या सूचना केल्या. मात्र त्याने सुरुवातीस नकार दिला. याची माहिती पोलिसांना देताच पोलीस कर्मचारी कैलास ढोले, प्रसाद आचरेकर यांनी त्यांच्या घरी जात योग्य समज दिल्यानंतर त्याने आरोग्य तपासणी करून घेतली. त्यानंतर त्याची विलगीकरण कक्षात रवानगी करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फार्णे अधिक तपास करत आहेत.