शिवसेनेतूनच भरा नगराध्यक्षपदाचा अर्ज
By admin | Published: October 26, 2016 10:47 PM2016-10-26T22:47:26+5:302016-10-26T22:47:26+5:30
बबन साळगावकरांना आग्रह : नगरसेवकांचाही पाठिंबा; आज निर्णय
सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) : सावंतवाडी नगरपरिषदेचे विद्यमान नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या पक्ष प्रवेशाकडे जिल्ह्याचे लक्ष वेधून घेत असतानाच बुधवारी सावंतवाडी नगरपरिषदेतील सर्व नगरसेविका, नगरसेवक, शहरातील नागरिकांनी साळगावकर यांची भेट घेऊन शिवसेनेतूनच नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज भरावा, असा आग्रह धरला. मात्र, साळगावकर यांनी आपल्या सहकाऱ्यांशी बोलून आज, गुरुवारी निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले.
सावंतवाडी नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस राहिले असून, विद्यमान नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी अद्यापही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. दरम्यान, सावंतवाडी येथील पाटील कॉम्प्लेक्स येथे सावंतवाडी नगरपरिषदेतील नगरसेविका, नगरसेवक, शहरातील प्रतिष्ठित व सर्वसामान्य नागरिकांनी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची अचानक भेट घेतली.
सावंतवाडी नगरपरिषदेतील सर्व सत्ताधारी नगरसेवकांनी शहरातील नागरिकांसमवेत शक्तिप्रदर्शन करून पाठिंबा दर्शविला व आपण शिवसेनेतूनच नगराध्यक्षपदाचा अर्ज दाखल करावा, असा अट्टहास धरला. यावेळी ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो यांनीही नगराध्यक्ष बबन साळगावकरच शिवसेनेतून नगराध्यक्षपदाचे उमेदवार असून आज अर्ज दाखल करणार असल्याचे लोबो यांनी सांगितले. यावेळी आम्हाला तेच नगराध्यक्ष पाहिजेत, अशी सर्व नागरिक, नगरसेवक यांनी भूमिका घेतली.
गेल्या कित्येक महिन्यांपासूनचीे शहरवासीयांची संभ्रमता दूर होणार असून, अखेर नगराध्यक्ष बबन साळगावकर शिवसेनेचाच झेंडा हातात घेण्याची शक्यता आहे. आपण पुन्हा नगराध्यक्ष होण्याची जनतेचीच इच्छा आहे. मी जनतेचा अनादर करणार नाही व जनतेच्या हिताच्या दृष्टीनेच निर्णय घेणार असल्याचे साळगावकर यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो, शर्वरी धारगळकर, कीर्ती बोंद्रे, क्षिप्रा सावंत, शुभांगी सुकी, अफरोज राजगुरू, साक्षी कुडतरकर, नगरसेवक विलास जाधव, संजय पेडणेकर, देवेंद्र्र टेमकर, बाबू कुडतरकर, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, रेमी आल्मेडा, रॉबर्ड आल्मेडा, गुरू वारंग, बाबल्या दुभाषी, सीताराम गावडे, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
साळगावकरांची केसरकरांना गुगली
पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याशी मंगळवारी रात्री चर्चा झाली. यामध्ये शिवसेनेत जायचा विषयच आला नाही. यावेळी निवडणूक न लढविण्याचा विचार करून थांबायचा निर्णय घेतला आहे. उपनगराध्यक्ष राजन पोकळे इच्छुक असतील, तर त्यांना तिकीट द्या, असे मी दीपक केसरकर यांना सांगितले आहे. त्यामुळे राजन पोकळे यांचा सन्मान करा, असेही साळगावकर यांनी सांगितले.