वेंगुर्ले शहर स्वच्छ, सुंदर करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2015 09:34 PM2015-06-11T21:34:43+5:302015-06-12T00:48:19+5:30
ज्येष्ठ नागरिकांचा निर्धार : संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा
वेंगुर्ले : येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शहराला स्वच्छ व सुंदर बनविण्याची संकल्पना मांडून यासाठी सर्वातोपरी मदत करण्याचा निर्धार ज्येष्ठ नागरिकांनी केला.संघाचे अध्यक्ष रा. पां. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली साई मंगल कार्यालयात मंगळवारी (दि. ९) सभा पार पडली. यावेळी न. प. चे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी सभेपुढे स्वच्छ व सुंदर वेंगुर्लेची संकल्पना मांडली. सभेच्या सुरुवातीला संघाचे सर्व दिवंगत सदस्य तसेच नेपाळच्या भूकंपात दगावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यवाह रघुनाथ परब यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून सभेपुढील कामांची माहिती दिली. उपाध्यक्ष शामराव काळे यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले. संघाच्या २०१४-१५ च्या अहवाल जमाखर्चाला तसेच २०१५-१६ च्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली. का. हु. शेखा यांची अंतर्गत हिशेब तपासणीस म्हणून फेरनिवड करण्यात आली.
माधवबाग येथील साने केअर सेंटरच्यावतीने डॉ. पल्लवी पाटील यांनी ज्येष्ठांसाठी हृदयरोगाची कारणे व उपाय यावर मागदर्शन केले. प्रोजेक्टरच्या माध्यमातून हृदयात व रक्तवाहिनीत उत्पन्न होणारे अडथळे यांचे सचित्र वर्णन करून उपचार पद्धतीची परिपूर्ण माहिती दिली. तसेच आहार व व्यायाम यावर ज्येष्ठांनी जास्त भर द्यावा, असे सांगितले व भविष्यात ज्येष्ठांसाठी मोफत तपासणी शिबिर घेण्याचे आश्वासन दिले. अध्यक्ष रा. पां. जोशी यांनी साई मंगल कार्यालयाचे अंबरीश मांजरेकर, डॉ. पल्लवी पाटील व सहकारी व सर्व देणगीदारांचे आभार मानले. (प्रतिनिधी)